वृत्तसंस्था / नवी दिल्ली
व्यावसायिक उपयोगासाठीच्या 19 किलो वजनाच्या गॅस सिलिंडरचा दर 1 जानेवारीपासून 14.50 रुपयांनी कमी झाला आहे. त्याचप्रमाणे विमानाच्या इंधनाच्या दरातही 1.5 प्रतिशत कपात करण्यात आली आहे. गॅस सिलिंडरचे दर कमी झाल्याचा लाभ उद्योजकांना होणार आहे. विमान प्रवासही काही प्रमाणात स्वस्त होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. विमान इंधनाचा दर 84 हजार 511 रुपये प्रती हजार लिटर असा करण्यात आलेला आहे. तर 19 किलो वजनाच्या वाणिज्य सिलिंडरची किंमत 1,804 रुपये करण्यात आली आहे.
कमर्शियल गॅस सिलिंडरच्या दरात यापूर्वी सलग पाचवेळा वाढ करण्यात आली होती. त्यानंतर प्रथमच ही कपात करण्यात आली आहे. यापूर्वीच्या पाच महिन्यांमध्ये या गॅसचे दर एकंदर 172.5 रुपये वाढविण्यात आले होते. या कपातीमुळे व्यापाऱ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळाल्याचे बोलले जात आहे.
आंतरराष्ट्रीय दरांशी संबंधित
भारताने आपल्या देशात विकल्या जाणाऱ्या स्वयंपाकाचा किंवा वाणिज्य गॅस तसेच विमान इंधनाचे दर आंतरराष्ट्रीय बाजारातील दरांशी निगडीत ठेवले आहेत. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात या वस्तूंच्या दरात थोडेसे परिवर्तन झाले की देशातील त्यांच्या दरावर त्यानुसार परिणाम होतो. इंडियन ऑईल कॉर्पोरेशन, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्थान पेट्रोलियम या केंद्र सरकारच्या मालकीच्या कंपन्या असून त्या भारतात पेट्रोल, डिझेल आणि स्वयंपाकाच्या किंवा वाणिज्य गॅसचे दर ठरवितात. विमान इंधनाचे दरही ठरविण्याचे उत्तरदायित्व याच कंपन्यांचे आहे. या कंपन्या परिस्थितीचा वेळोवेळी आढावा घेऊन या जीवनावश्यक वस्तूंचे दर ठरवितात. सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या इंधन तेलाचे दर काही प्रमाणात कमी झाले असल्याने या देशातील या दरांमध्ये कपात करण्यात आली आहे.
स्वयंपाकाच्या गॅसचे दर स्थिर
स्वयंपाकासाठी उपयोगात आणल्या जाणाऱ्या आणि 14.2 किलो वजनाच्या गॅस सिलिंडरचा दर सध्याच्याच पातळीवर स्थिर ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हा दर सध्या सर्वसाधारणत: 803 रुपये प्रति सिलिंडर इतका आहे. या दरात गेल्या कित्येक महिन्यांमध्ये वाढ किंवा कपात करण्यात आलेली नाही. पेट्रोल आणि डिझेल यांच्या दरांमध्येही विशेष परिवर्तन झालेले नाही. गेल्या मार्च महिन्यात पेट्रोलच्या दरात 2 रुपये प्रतिलीटर कपात करण्यात आली होती. दिल्लीत सध्या पेट्रोलचा दर 94.72 रुपपे प्रतिलीटर असा असल्याची माहिती देण्यात आली.









