घरगुती सिलिंडर दर ऑक्टोबरमध्ये स्थिर
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्याच दिवशी तेल कंपन्यांनी मोठा धक्का देत ऐन सणासुदीच्या काळात कमर्शियल (व्यावसायिक) एलपीजी सिलिंडरच्या दरात 209 रुपयांनी वाढ जाहीर केली आहे. चालू महिन्यात झालेली ही वाढ केवळ 19 किलोग्रॅमच्या व्यावसायिक सिलिंडरसाठी असून घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किमती कायम राहतील. याआधी सप्टेंबरमध्ये तेल कंपन्यांनी गॅस सिलिंडरची किंमत 157 रुपयांनी कमी केली होती. मार्च महिन्यानंतर व्यावसायिक सिलिंडरच्या किमतीत झालेली ही पहिलीच मोठी वाढ आहे. वाढीव दरानुसार आता दिल्लीत 19 किलोचा व्यावसायिक सिलिंडर 1,731.50 रुपयांना मिळणार आहे.
ऑक्टोबर महिन्यात नवरात्री, दसरा यांसारखे सण साजरे केले जाणार आहेत. अशातच सणासुदीच्या काळातच एलपीजीच्या किमतींमध्ये वाढ केल्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशावरचा ताण वाढणार आहे. दिल्लीत व्यावसायिक सिलिंडरची किंमत 209 रुपयांनी वाढल्यामुळे तो आता 1,522.50 रुपयांऐवजी 1,731.50 रुपयांना मिळणार आहे. कोलकातामध्ये व्यावसायिक गॅस सिलिंडर 1,636 रुपयांऐवजी 1,839.50 रुपयांना, मुंबईत 1,482 रुपयांऐवजी 1,684 रुपयांना आणि चेन्नईमध्ये 1,695 रुपयांऐवजी 1,898 रुपयांना मिळणार आहे. 1 मार्च 2023 रोजी व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किमतीत 350 रुपयांनी वाढ करण्यात आली होती.
महिन्याभरापूर्वी 30 ऑगस्ट रोजी सरकारने 14.2 किलोच्या एलपीजी सिलिंडरची किंमत 200 रुपयांनी कमी करण्याचा निर्णय घेत सर्वसामान्यांना महागाईपासून मोठा दिलासा दिला होता. यानंतर 1 ऑक्टोबर रोजी घरगुती एलपीजीच्या किमतीत कोणताही बदल करण्यात आलेला नाही. सध्या 14.2 किलोचा घरगुती गॅस सिलिंडर दिल्लीत 903 रुपये, कोलकात्यात 929 रुपये, मुंबईत 902.50 रुपये आणि चेन्नईमध्ये 918.50 रुपयांना उपलब्ध आहे. इतर अनेक शहरांमध्ये सिलिंडरचे दर 200 रुपयांनी कमी झाले आहेत. याशिवाय, उज्ज्वला योजनेंतर्गत उपलब्ध एलपीजी गॅस सबसिडी देखील 400 रुपये करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत उपलब्ध असलेल्या एलपीजी सिलिंडरची किंमत 703 रुपयांपर्यंत खाली आली आहे.









