वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
सप्टेंबर महिन्याच्या प्रारंभी कमर्शियल गॅस सिलिंडर स्वस्त झाला आहे. तेल विपणन कंपन्यांनी कमर्शियल गॅस सिलिंडरच्या दरात 51.50 रुपयांपर्यंतची कपात केली आहे. यामुळे दिल्लीत कमर्शियल गॅस सिलिंडरची किंमत कमी होत आता 1580 रुपये झाली आहे. यापूर्वी ऑगस्ट महिन्यातही कमर्शियल गॅस सिलिंडर स्वस्त झाला होता. परंतु 14 किलोग्रॅमच्या घरगुती वापराच्या गॅस सिलिंडरच्या दरात कुठलाही बदल करण्यात आलेला नाही.
तर कमर्शियल गॅस सिलिंडरचा कोलकाता शहरातील दर आता कमी होत 1684 रुपयांवर आला आहे. मुंबईत देखील याच्या किमती 1582.50 रुपयांवरून कमी होत 1531.50 रुपयांवर आल्या आहेत. तर चेन्नईत 19 किलो वजनाच्या सिलिंडरकरता आता 1789 रुपये नव्हे तर 1738 रुपये द्यावे लागणार आहेत. 19 किलो वजनाच्या कमर्शियल सिलिंडरच्या किमती मागील काही महिन्यांपासून सातत्याने कमी झाल्या आहेत. यापूर्वी ऑगस्ट महिन्यात तेल विपणन कंपन्यांनी कमर्शियल सिलिंडरची किंमत 33.50 रुपयांनी कमी केली होती. तर जुलै महिन्यात कमर्शियल सिलिंडर 58 रुपयांनी स्वस्त झाला होता.
तेल कंपन्यांकडून दर महिन्याच्या पहिल्या तारखेला एलपीजी सिलिंडरच्या दरांच समीक्षा केली जाते आणि यानंतर नवे दर जारी केले जातात. या नव्या किमती कच्च्या तेलाच्या आंतरराष्ट्रीय बाजारातील किमती, भारतीय चलनाच्या स्थितीसह अन्य घटकांवर निर्भर असतात. 19 किलोचा कमर्शियल सिलिंडर स्वस्त झाल्याने हॉटेल, रेस्टॉरंट, ढाबा आणि अन्य व्यावसायिक संस्थांना दिलासा मिळणार आहे.









