घरगुती सिलिंडरची किंमत जैसे थे
वृत्तसंस्था/नवी दिल्ली
तेल विपणन कंपन्यांनी महागाईपासून दिलासा देत कमर्शियल (व्यावसायिक) एलपीजी सिलिंडरच्या किमती 17 रुपयांपर्यंत कमी केल्या आहेत. एलपीजी सिलिंडरच्या किमतीत झालेल्या या ताज्या कपातीनंतर नवीन किमती गुरुवार, 1 मे पासून लागू झाल्या आहेत. कंपन्यांनी 19 किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या किमतीत ही कपात केली आहे. मात्र, घरगुती वापरातील 14.2 किलोग्रॅमच्या एलपीजी सिलिंडरच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही. तेल कंपन्यांच्या या निर्णयामुळे सामान्य लोकांना कोणताही दिलासा मिळणार नाही. मात्र, व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या किमतीत झालेल्या कपातीमुळे रेस्टॉरंट आणि हॉटेल मालकांना थोडाफार लाभ मिळणार आहे.
सुधारित दरानुसार दिल्लीत व्यावसायिक एलपीजी सिलिंडरची नवीन किंमत 1,747.50 रुपये झाली आहे. गेल्या पाच महिन्यात व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या किमती चारवेळा कमी करण्यात आल्या आहेत. तर एकदा किंमत वाढवण्यात आली होती. 19 किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या किमतीत 1 जानेवारी रोजी 14.5 रुपये, 1 फेब्रुवारी रोजी 7 रुपये, 1 मार्च रोजी 6 रुपये आणि 1 एप्रिल रोजी 41 रुपयांची कपात करण्यात आली. त्यानंतर 1 मे रोजी त्यात 15 ते 17 रुपयांची कपात करण्यात आली आहे. व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या किमतीत झालेल्या या कपातीनंतर देशातील प्रमुख शहरांमध्ये सिलिंडर स्वस्त झाले आहेत.









