वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
तेल विपणन कंपन्यांनी व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमतीत तत्काळ प्रभावाने वाढ केली आहे. नवीन महिन्याच्या प्रारंभी म्हणजेच 1 डिसेंबर 2024 पासून 19 किलोच्या व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरात 16.50 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. तसेच 5 किलो फ्री ट्रेड एलपीजी सिलिंडरची किंमतही 4 रुपयांनी वाढली आहे. मात्र, 14.2 किलोच्या घरगुती सिलिंडरच्या किमती स्थिर आहेत.
दिल्लीत रविवारपासून 19 किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलिंडरची किरकोळ विक्री किंमत 1,818.50 रुपये झाली आहे. देशातील अन्य शहरांमध्ये या दरात स्थानिक पातळीनुसार थोडाफार फरक आहे. गेल्या महिन्यात म्हणजेच नोव्हेंबरमध्येही 19 किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलिंडरचे दर 62 रुपयांनी वाढवण्यात आले होते. व्यावसायिक सिलिंडरच्या दरांमध्ये वाढ झाल्यामुळे व्यावसायिक आस्थापने आणि लहान व्यवसायांवर परिणाम होण्याची अपेक्षा आहे. व्यावसायिक एलपीजीच्या किमती वाढल्या असूनही, घरगुती एलपीजी सिलिंडरच्या दरांमध्ये कोणताही बदल न झाल्यामुळे गृहिणींना काहीसा दिलासा मिळाला आहे.









