प्रतिनिधी,कोल्हापूर
येथील देशभक्त रत्नाप्पा कुंभार कॉलेज ऑफ कॉमर्सचे प्राचार्य डॉ. व्ही. ए. पाटील यांची शिवाजी विद्यापीठाच्या वित्त आणि लेखा विभागाच्या समितीवर निवड करण्यात आली आहे. शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांनी महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ कायदा 2016 च्या कलम 94 अंतर्गंत प्राचार्य डॉ. पाटील यांची वित्त आणि लेखा विभागाच्या समितीवर नियुक्ती केल्याचे नुकतेच जाहीर केले.
शिक्षण क्षेत्रात गेली 32 वर्षे कार्यरत असणारे प्राचार्य डॉ. व्ही. ए. पाटील गेली सात वर्षे कॉमर्स कॉलेजच्या प्राचार्यपदाची जबाबदारी पार पाडत आहेत. त्यांच्या कारकीर्दीत कॉलेजमध्ये अनेक नवनवीन अभ्यासक्रम, उपक्रम राबविण्यात आले आहेत. अकौंटस् अँड फायनान्स या विषयावरील त्यांची पंचवीसहून अधिक पुस्तके प्रकाशित झाली आहेत. दीड महिन्यांपूर्वी त्यांची शिवाजी विद्यापीठाच्या विद्या परिषदेवर राज्यपाल नियुक्त सदस्य म्हणूनही नियुक्ती झाली आहे.









