पवार गल्लीतील कूपनलिकेची एल अॅण्ड कंपनीकडून दुरुस्ती
बेळगाव : यावर्षी पाऊस कमी झाल्यामुळे पाण्याची समस्या उद्भवणार आहे. त्याबाबत आमदार राजू सेठ यांनी शहरातील बंद असलेल्या कूपनलिका दुरुस्त करण्याची सूचना केली होती. त्यानुसार दुसऱ्याच दिवशी मंगळवारी वॉर्ड क्रमांक 27 मधील पवार गल्ली, शहापूर येथील बंद असलेल्या कूपनलिकेची तातडीने दुरुस्ती एल अॅण्ड टी कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी केली आहे. आमदार तसेच पालकमंत्री यांच्या सूचनेमुळे एल अॅण्ड टी कंपनी कामाला लागली असून आता बंद असलेल्या कूपनलिकांची दुरुस्ती करण्यास सुरूवात केली आहे. नगरसेवक रवी साळुंखे व या परिसरातील नागरिकांच्या उपस्थितीत मंगळवारी दुरुस्ती करण्यात आली. त्यामुळे या परिसरातील नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. आणखीही या परिसरातील बंद असलेल्या कूपनलिकांची दुरुस्ती केली जाणार आहे. एकूणच आता तातडीने याची दखल घेऊन एल अॅण्ड टी कंपनीने सुरू असलेल्या कामामुळे समाधान व्यक्त होत आहे.









