500 हून अधिक स्पर्धकांचा सहभाग
क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव
राणी चन्नम्मा विद्यापीठ क्रीडा स्पर्धांना मोठय़ा उत्साहात जिल्हा क्रीडांगणावर प्रारंभ झाला. नेहरूनगर येथील जिल्हा क्रीडांगणावर आयोजित राणी चन्नम्मा विद्यापीठ क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून विद्यापीठाचे कुलगुरू एम. रामचंद्र गौड, युवजन क्रीडा व युवा सबलीकरणाचे निर्देशक जनेश्वर पडणार, आरसीयूचे रजिस्ट्रार एम. हणमंतप्पा, आरसीयूचे शिवानंद गुरनाळे, फायनान्स ऑफिसर डी. एन. पाटील आदी उपस्थित होते.
प्रारंभी 19 विभागाच्या सर्व विद्यार्थ्यांनी मैदानावर पथसंचलन करून पाहुण्यांना मानवंदना दिली. पाहुण्यांचे स्वागत डॉ. पी. नागराज यांनी केले. पाहुण्यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. उपस्थित पाहुण्यांना 19 विभागाच्या संघांची ओळख करून देण्यात आली. यावेळी प्रा. एस. जी. आकाश, प्रा. विजय नागण्णावर, आरसीयूचे प्रमुख क्रीडा प्राध्यापक जगदीश गस्ती, माहेश्वरी काचापूर, परशुराम मुक्कण्णावर, शालिनी देशनूर, लगमण्णा अंकलगी, सुप्रिया गुरव, जी. एन. पाटील, एच. एस. सिंगाडे, शंकर कोलकार आदी उपस्थित होते.
या स्पर्धेत व्हॉलिबॉल, थ्रोबॉल, कबड्डी, 100 मी. धावणे, 200 मीटर, 400, 800, 4ƒ100 मीटर रिले, उंच उडी, लांब उडी, गोळाफेक, भालाफेक आदी खेळांचा समावेश आहे. या स्पर्धेत 500 हून अधिक स्पर्धकांनी भाग घेतला आहे. तीन दिवस चालणाऱया स्पर्धेत ऍथलेटीक्स व सांघिक खेळ घेण्यात येणार आहेत.









