येत्या दोन दिवसांत प्रक्रियेला सुरुवात : मात्र नवीन अर्ज स्वीकृती नाही
प्रतिनिधी/ बेळगाव
कित्येक दिवसांपासून थांबलेल्या बीपीएल आणि एपीएल रेशनकार्ड वितरणास प्रारंभ झाला आहे, अशी माहिती अन्न व नागरी पुरवठा मंत्री के. एच. मुनियप्पा यांनी दिली आहे. यामुळे रेशनकार्डसाठी अर्ज केलेल्यांना दिलासा मिळाला आहे.
अनेकांनी नवीन एपीएल आणि बीपीएल रेशनकार्डसाठी अर्ज केले आहेत. मात्र, रेशनकार्ड वितरणाची प्रक्रिया मागील कित्येक दिवसांपासून बंद होती. त्यामुळे शासकीय योजनांबरोबरच सरकारच्या गॅरंटी योजनांपासून दूर रहावे लागले आहे. मात्र, आता अन्न व नागरी पुरवठा खात्याने अर्ज केलेल्या नागरिकांना रेशनकार्ड वितरणासाठी हिरवाकंदील दाखविला आहे.
रेशनकार्डातील दुरुस्तीसाठी आलेल्या अर्जांची पडताळणी करून कार्डांचे वितरण करण्यात येत आहे. शिवाय अलीकडे अर्ज करून रेशनकार्डच्या प्रतीक्षेत असलेल्यांना शक्य तितक्या लवकर कार्डे वितरित केली जातील, अशी माहितीदेखील मंत्री मुनियप्पा यांनी दिली. सध्या बीपीएल कार्डधारकांना प्रतिव्यक्ती 5 किलो तांदूळ वितरित केले जात आहेत. त्याचबरोबर प्रतिव्यक्ती 170 रुपये दिले जात आहेत.
काँग्रेसने 10 किलो तांदूळ देण्याची घोषणा केली होती. मात्र, अतिरिक्त तांदूळसाठा उपलब्ध झाला नसल्याने तांदळाऐवजी रोख रक्कम दिली जात आहे. शासकीय योजनांबरोबर गॅरंटी योजनांचा लाभ घेण्यासाठी रेशनकार्डच्या मागणीत वाढ झाली आहे. दरम्यान, अनेकांनी रेशनकार्डसाठी ऑनलाईन अर्ज केले आहेत. जिल्ह्यात अर्ज केलेल्यांची संख्या मोठी आहे. त्यामुळे किती कुटुंबीयांना रेशनकार्ड मिळणार? हे पहावे लागणार आहे.
नवीन एपीएल आणि बीपीएल कार्ड वितरित केले जात असले तरी नवीन अर्ज स्वीकृती मात्र थांबविण्यात आली आहे. यापूर्वी अर्ज केलेल्यांना रेशनकार्डे वितरित केली जाणार आहेत. त्यामुळे नवीन रेशनकार्डसाठी अर्ज करणाऱ्यांना अद्याप प्रतीक्षा करावी लागणार आहे.
रेशन न घेणाऱ्यांची बीपीएल कार्डे सुरू राहणार
-श्रीशैल कंकणवाडी (सहसंचालक, अन्न व नागरी पुरवठा खाते)
नवीन एपीएल आणि बीपीएल कार्ड वितरणास प्रारंभ झाला आहे. जिल्ह्यात येत्या दोन दिवसांत ही प्रक्रिया सुरू केली जाणार आहे. अर्ज केलेल्यांना रेशनकार्ड वितरित केली जाणार आहेत. मात्र, नवीन अर्ज स्वीकृती बंद आहे. जे लोक रेशन घेत नाहीत, त्यांची बीपीएल कार्डे रद्द केली जाणार नाहीत आणि त्यांना आरोग्य योजनांसाठी कार्ड वापरण्याची परवानगी आहे.









