प्रतिनिधी / बेळगाव
महांतेशनगर येथील लिंगायत संघटनेच्या वार्षिक उत्सवाला गुरुवारी प्रारंभ झाला. तीन दिवस यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. स्मशानात सेवा बजावणाऱ्या देवाप्पा कांबळे यांच्या हस्ते रोपट्याला पाणी घालून वार्षिकोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले.
शिरुर येथील शिवयोग व निसर्ग चिकित्सा केंद्र, चित्तरगी विजयमहांतेश तीर्थचे श्री मनिप्र डॉ. बसलिंग स्वामीजींच्या हस्ते षट्स्थल ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी बोलताना स्वामीजी म्हणाले, महात्मा बसवेश्वर आणि त्यांच्या समकालीन संतांनी समाजातील अंधश्रद्धा दूर करून लोकशाहीची बिजे रुजवली. आता तर संपूर्ण जगाने हे मान्य केले आहे. संघटनेचे अध्यक्ष इरण्णा दयान्नावर यांनी प्रास्ताविक केले. यावेळी बसवतत्व अनुभव केंद्राच्या कुमुदिनीताई, शंकर गुड्स, शशिभूषण पाटील, सतीश पाटील, रमेश कळसण्णावर, महांतेश देसाई, बसवप्रभू पाटील आदी उपस्थित होते. वाग्देवीताई यांचे प्रवचन आयोजित करण्यात आले होते. सुरेश नरगुंदकर यांनी स्वागत केले. सदाशिव देवरमनी यांनी सूत्रसंचालन केले.









