9 कोटी मंजूर : गुंजेनहट्टी क्रॉस-हंदिगनूर रस्त्याचेही रुंदीकरण, डांबरीकरण होणार
वार्ताहर /कडोली
सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि बेळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी मंजूर केलेल्या एकूण 9 कोटी निधीतून गुंजेनहट्टी क्रॉस ते हंदिगनूर, कडोली ते अगसगा, जाफरवाडी पांदी ते गौंडवाड आणि गुंजेनहट्टी गावातील रस्त्यांचे भूमिपूजन बुधवारी उत्साहात पार पडले. गुंजेनहट्टी क्रॉस ते हंदिगनूर रस्त्याचे रुंदीकरण आणि डांबरीकरण करण्यात येणार असून यासाठी सुमारे 5 कोटी रुपये मंजूर केले आहेत. सदर रस्ता अरुंद आहे. त्यामुळे वाहनधारकांना अनेक अडचणी निर्माण होत होत्या. आता स्त्याचे रुंदीकरण होणार असल्याने ग्रामस्थांत समाधान व्यक्त होत आहे. कडोली ते अगसगा रस्त्याचे डांबरीकरण करण्यासाठी 3 कोटी 62 लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत. गुंजेनहट्टी येथील श्री होळी कामाण्णा मंदिर समोरील रस्त्याचे डांबरीकरण करण्यात येणार आहे. शिवाय जाफरवाडी पांदी ते गौंडवाड हा रस्ता होणार आहे. युवा काँग्रेस नेता राहुल जारकीहोळी यांच्या उपस्थितीत कडोली ग्रा. पं. अध्यक्ष सागर पाटील, उपाध्यक्षा दीपा मरगाळे, केपीसीसी सदस्य मलगौडा पाटील, केदनूर ग्रा. पं. अध्यक्षा सविता संभाजी, उपाध्यक्षा लक्ष्मी बेळगावी, जि. पं. माजी उपाध्यक्ष अरुण कटांबळे, ग्रा. पं. सदस्य, सदस्या यांच्या हस्ते विविध ठिकाणी भूमिपूजन करण्यात आले. यावेळी ग्रामस्थ, कार्यकर्ते उपस्थित होते. सूत्रसंचालन राजू मायाण्णा यांनी केले.









