प्रतिनिधी /बेळगाव
भविष्यातील रेल्वे प्रवाशांची संख्या वाढणार असल्याने बेळगाव रेल्वेस्थानकात सरकता जिना बसविण्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली. प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वर हा सरकता जिना बसविण्यात येत आहे. यापुढे नागरिकांना जिना चढण्यासाठी मेहनत घ्यावी लागणार नसल्याने समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
बेळगाव रेल्वेस्थानक हे भविष्यात मोठे रेल्वेस्थानक म्हणून उदयाला येणार आहे. येथून दिल्ली, मुंबई, बेंगळूर, पुणे, तिरुपती, चंदीगड, पंढरपूर, एर्नाकुलम, म्हैसूर, गोवा या शहरांना रेल्वेगाडय़ा जातात. त्यामुळे दररोज हजारो प्रवासी रेल्वेस्थानकावरून प्रवास करतात. कोरोनापूर्वी पॅसेंजर सुरू असल्याने त्यावेळी प्रवाशांची संख्या दुप्पट होती. काही दिवसांनी पुन्हा पॅसेंजर सुरू होणार असल्याने प्रवासी संख्येत मोठी वाढ होण्याची शक्मयता आहे. भविष्याचा विचार करून नैर्त्रुत्य रेल्वेने सरकता जिना बसविण्याचा निर्णय घेतला आहे.
रेल्वेस्थानकाच्या नूतनीकरणाचे काम सुरू असून प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वर सरकता जिना बसविण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. पेनच्या सहाय्याने साहित्य बसविण्यात येत आहे. यामुळे लहान मुले, वृद्ध यांची सोय होणार आहे. जिन्यावर उभे राहिल्यानंतर जिना सरकत फूट ओव्हरब्रिजवर पोहचणार आहे. गर्दीच्यावेळी लिफ्ट अपुरी पडत असून सरकत्या जिन्यामुळे प्रवाशांची सोय होणार आहे.
प्लॅटफॉर्म क्र. 4 वरही बसवणार सरकता जिना
यापूर्वी केवळ लिफ्टची सोय असल्याने प्रवाशांचे हाल होत होते. त्यात बऱयाचवेळा लिफ्ट नादुरुस्त होत असल्याने प्रवाशांना नाईलाजस्तव जीना चढून जावे लागत होते. यासाठी प्लॅटफॉर्म क्रमांक एकसोबत चारवर देखील सरकता जिना बसविण्यात येणार आहे. रेल्वेस्थानकाला दक्षिण दरवाजा झाल्यास हा जिना महत्त्वाचा ठरणार आहे. तसेच प्लॅटफॉर्म क्रमांक दोन व तीनवर लिफ्टची व्यवस्था करण्यात येणार असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.









