एक हजार यात्रेकरू तिरुपतीला रवाना : मुख्यमंत्र्यांनी दाखविला हिरवा झेंडा
प्रतिनिधी /मडगाव
विधानसभा निवडणुकीच्या वेळी भाजपने 50 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांसाठी मुख्यमंत्री देवदर्शन यात्रेची घोषणा केली होती. काल सोमवारी प्रत्यक्ष या यात्रेला प्रारंभ झाला. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी मडगाव कोकण रेल्वे स्थानकावर गोवा ते तिरूपती यात्रेला हिरवा झेंडा दाखविला. काल सुमारे 1 हजार यात्रेकरू तिरूपतीला रवाना झाले. तिरूपतीकडे निघालेल्या रेलगाडीला 15 डब्यांची व्यवस्था करण्यात आली होती.
समाजकल्याण विभागाने या योजनेची काल सुरुवात केली असून, सांगे तालुका आणि राज्याच्या इतर भागांतील एक हजार यात्रेकरू तिरूपतीच्या पहिल्या दौऱयावर रवाना झाले आहेत. या कार्यक्रमाला समाज कल्याणमंत्री सुभाष फळदेसाई, सार्वजनिक बांधकाममंत्री नीलेश काब्राल, आमदार दिगंबर कामत, आमदार दाजी साळकर, आमदार आलेक्स सिक्वेरा, आमदार रूडॉल्फ फर्नांडिस, दक्षिण गोवा जिल्हा पंचायत अध्यक्ष सौ. सुवर्णा तेंडूलकर, सांगेच्या नगराध्यक्ष श्रीमती सीमा नाईक, समाज कल्याण खात्याच्या संचालक सौ. संध्या कामत, आयआरटीसीचे सरव्यवस्थापक राजीव जैन इत्यादी उपस्थित होते.
ज्ये÷ नागरिकांना तिरूपतीला श्री पद्मावती आणि श्री बालाजीची पूजा करण्याची संधी मिळणार आहे. ‘इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन’च्या सहकार्याने विविध ठिकाणांचा समावेश करून यात्रा योजना सुरू राहणार आहे.
ज्येष्ठांची तिर्थाटनाची इच्छा पूण&
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी यावेळी बोलताना ‘मुख्यमंत्री देवदर्शन योजने’अंतर्गत ज्ये÷ नागरिकांना देशभरातील पवित्र स्थळांना भेट देण्याची संधी मिळणार असल्याने समाधान व्यक्त केले. ते म्हणाले की प्रत्येक वृद्ध व्यक्तीला आयुष्यात एकदा तीर्थयात्रेला जाण्याची इच्छा असते परंतु काही कारणास्तव लोक त्यांची इच्छा पूर्ण करू शकत नाहीत. सरकारच्या या योजनेमुळे ज्ये÷ नागरिकांच्या आकांक्षा पूर्ण करण्यात आणि त्यांच्या जीवनात आनंद भरण्यास सक्षम आहे.
यात्रेत ज्येष्ठांसाठी सर्व सुविधा उपलब्ध
राज्याच्या विकासासाठी सरकार कटिबद्ध आहे, पण त्याचबरोबर जनतेचा आनंद वाढविण्यासाठीही प्रयत्नशील आहे. मुख्यमंत्री देवदर्शन योजना हा लोकांमध्ये आनंद निर्माण करणारा एक उपक्रम आहे. वालांकिणी तसेच पुन्हा तिरूपती, शिर्डी इत्यादी स्थळांना देखील गोव्यातील ज्येष्ठ नागरिकांना भेट देण्याची संधी मिळणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. या यात्रेत डॉक्टर तसेच सर्व यात्रेकरूची व्यवस्था पाहण्यासाठी खास माणसे नियुक्त केल्याचे त्यांनी सांगितले. तसेच यात्रेकरूना खाण्या-पिण्यासाठी पदरमोड करावी लागणार नाही.
प्रवास, निवास, भोजनखर्च सरकारी
मंत्री सुभाष फळदेसाई यांनी सर्व यात्रेकरूंना तिरुपती बालाजीच्या सुखी आणि सुरक्षित प्रवासाच्या शुभेच्छा दिल्या. या योजनेंतर्गत यात्रेकरूंचा प्रवास, भोजन आणि निवासाचा सर्व खर्च शासनाने केला असल्याची माहिती त्यांनी दिली. विभागातर्फे लवकरच वालांकिणी आणि शिर्डी या पवित्रस्थळांची यात्राही आयोजित केली जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
‘इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन’ सहकार्याने समाज कल्याण संचालनालयाने या सहलीचे आयोजन केले आहे. यात्रेकरूंच्या सर्व गरजा पूर्ण करेल आणि भगवान तिरुपतीच्या भेटीदरम्यान लोकांना सुविधा देईल, अशी माहिती राजीव जैन यांनी दिली.
सार्वजनिक बांधकाममंत्री नीलेश काब्राल व आमदार दिगंबर कामत यांनी आपले विचार मांडले. सौ. संध्या कामत यांनी सर्वांचे स्वागत केले.









