बेळगावमधून 13 शहरांना विमानसेवा : आठवडय़ातून पाच दिवस असणार विमानफेरी
प्रतिनिधी /बेळगाव
बेळगाव-भूज (गुजरात) क्हाया अहमदाबाद विमानफेरीला शुक्रवारपासून प्रारंभ झाला. यामुळे बेळगावच्या प्रवाशांना आता अवघ्या 3 तासांमध्ये भूज येथे पोहोचता येणार आहे. शुक्रवारी बेळगाव विमानतळावर भूजला जाणाऱया प्रवाशांचे शानदार स्वागत करण्यात आले. सोमवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार अशी एकूण पाच दिवस ही विमानफेरी असणार आहे.
स्टार एअरची बेळगाव-अहमदाबाद विमानफेरी सुरू होती. या विमानफेरीला जोडून अहमदाबाद-भूज ही विमानफेरी सुरू करण्यात आली. या विमानफेरीमुळे गुजरातला जाणाऱया प्रवाशांचा वेळ वाचणार आहे. स्टार एअरने 50 आसन क्षमता असणारे एअरक्राफ्ट सुरू केले. पहिल्याच दिवशी प्रवाशांनी भरभरून प्रतिसाद दिला. भूजवरून बेळगावला तर बेळगावहून भूजला ये-जा करणाऱया प्रवाशांची संख्या अधिक होती. यामुळे बेळगावमधून आता 13 व्या शहराला विमानफेरी सुरू झाली आहे. हा मार्ग उड्डाण-3 अंतर्गत मंजूर झालेला 17 वा मार्ग ठरला आहे.
प्रवाशांचे जल्लोषात स्वागत
बेळगाव परिसरात मोठय़ा प्रमाणात मारवाडी व गुजराथी समाज वास्तव्यास आहे. दररोज हजारो नागरिक बेळगाव-गुजरात असा प्रवास करत असतात. यापूर्वी विशेष रेल्वे धावत होत्या. परंतु कोरोना काळापासून या रेल्वे ठप्प आहेत. त्यामुळे बेळगावच्या प्रवाशांना मुंबई येथून गुजरातला जावे लागत आहे. परंतु आता विमानफेरी सुरू झाल्याने हा प्रवास सोयीचा ठरणार आहे. त्यामुळे गुजराथी व पाटीदार समाजाच्यावतीने शुक्रवारी प्रवाशांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. महिलांनी गरबा खेळत आनंद व्यक्त केला. विमानतळाचे संचालक राजेशकुमार मौर्य यांनी प्रवाशांचे स्वागत केले.









