तुळस : वार्ताहर
तुळस गावी तुळशीदास बेहेरे स्मरणसोहळा
‘पेटारो चलत र्हवाक होयो’ हे दशावतारी कलाकारांमध्ये रुजलेले भरतवाक्य आपल्या आयुष्याचे ध्येय मानणारे दशावतारी कलेचे थोर संशोधक कै. डॉक्टर तुळशीदास बेहेरे यांच्या जन्मदिवसाचे औचित्य साधून यंदाही १५ मे ला वेंगुर्ले तालुक्यातील तुळस गावातील ‘वरद’ या त्यांच्या निवासस्थानी डॉ. बेहेरे यांचा स्मरणसोहळा आयोजित करण्यात आला होता.तसेच त्यांच्या परिवाराने दशावतारी नाटकाचे आयोजनही केले होते. डॉ. बेहेरेंनी स्थापन केलेल्या सिद्धिविनायक दशावतारी मंडळातील कलाकारांनी ‘कर्कासुर’ या पुराणातील आख्यानाचे दशावतारी नाटक सादर केले. तुळस गावाच्या मातीत जन्मलेले डॉ. बेहेरे यांनी आपल्या मातीतली ही कला देशा-परदेशात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावी यासाठी कलाक्षेत्रात आणि शासनदरबारी भरीव प्रयत्न केले आहेत.
याप्रसंगी डॉ. बेहेरे यांच्या कार्याला मानवंदना आणि त्यांच्या स्मृतींना उजाळा देण्याकरीता गावच्या सरपंच रश्मी परब, उपसरपंच सचिन नाईक, माजी सरपंच शंकर घारे, ग्रामपंचायत सदस्य सुजाता पडवळ, रमाकांत ठोंबरे, जयवंत तुळसकर, नारायण कुंभार तसेच तंटामुक्ती अध्यक्ष मंदार तुळसकर, तुळस गावातील प्रसिद्ध उद्योजक संजय तांडेल, पराग सावंत आणि आनंद तांडेल उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरूवातीला सरपंच रश्मी परब यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून बेहेरे यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि स्वागत डॉ. बेहेरे यांच्या पत्नी .प्रा रेखा बेहेरे यांनी केले. यावेळी बेहेरे यांच्या कन्या तन्मयी, मृण्मयी उपस्थित होत्या. त्यानंतर समर्पक वेशभूषा, रंगभूषा ,उत्कृष्ट संवादफेक ,प्रभावी अभिनय आणि अप्रतिम नृत्य यामुळे बेहेरेंच्या तालमीतील कलाकारांनी सादर केलेला नाट्यप्रयोग रसिक प्रेक्षकांना भावला. अतिशय रंगतदार प्रयोगाचा त्यांनी आस्वाद घेतला. या गुणी कलाकारांचे कौतुक भाजप उपाध्यक्ष विश्वास सावंत यांच्या हस्ते भेटवस्तू देऊन केले.