नामदेवराव गावडे स्मृतिदिनानिमित्त प्रतिपादन
कसबा बीड / प्रतिनिधी
कसबा बीड तालुका करवीर येथे दिवंगत कॉम्रेड नामदेवराव गावडे यांचा स्मृतिदिन कार्यक्रम बीडशेड येथील महालक्ष्मी हॉलमध्ये संपन्न झाला. या स्मृतिदिन कार्यक्रमाची सुरुवात काँग्रेस नामदेवराव गावडे यांच्या प्रतिमेस अभिवादन करून मान्यवरांच्या हस्ते फुले वाहून सुरुवात करण्यात आली. या कार्यक्रमानिमित्त स्मृती जागर समितीमार्फत स्मरणिका प्रकाशन व पुरोगामी चळवळीतील कार्यकर्त्यांचा सन्मान करण्यात आला. सहकार चळवळीतील अभ्यास व्यक्तिमत्व, वाचन, आकलन शक्ती, आक्रमक भूमिका तसेच सामाजिक व राजकीय चळवळीत सहभागी असणारे नामदेवराव गावडे होते, असे माजी आमदार व कुंभी कासारी साखर कारखाना चेअरमन चंद्रदीप नरके यांनी आपल्या मनोगतात सांगितले.
कॉम्रेड नामदेवराव गावडे यांनी त्यांच्या कारकिर्दीमध्ये डाव्या आघाडीच्या विचारांनी प्रेरित होऊन कामगारांना न्याय मिळण्यासाठी, शेतकऱ्यांना योग्य न्याय मिळावा, कर्जमाफी मिळावी यासाठी त्यांनी शासन दरबारी आपले संपूर्ण आयुष्य झिजवले. 23 मार्चला 2022 ला कॉम्रेड नामदेव गावडे यांचे निधन झाले. म्हणून त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त हा कार्यक्रम संपन्न करण्यात आला. या कार्यक्रमांमध्ये कॉम्रेड दिलीप पवार, राम कळंबेकर, सुमन पाटील, दिनकर सूर्यवंशी, बी एल बर्गे, शांताबाई जाधव, बाळू पाटील, नामदेव पाटील , भिकाजी कुंभार, श्रीमती सुनंदा खाडे, शिवाजी तळेकर आदी पुरोगामी चळवळीत काम केलेल्या जेष्ठ कार्यकर्त्यांचा सन्मान करण्यात आला.
यावेळी कॉम्रेड सतीशचंद्र कांबळे, कॉम्रेड राम बहेती, यशवंत बँकेचे चेअरमन एकनाथ पाटील, माजी मार्केट समिती उपाध्यक्ष शामराव सूर्यवंशी, माजी आमदार व कुंभी- कासारी साखर कारखाना चेअरमन चंद्रदीप नरके, दिलीप पवार आदींची मनोगते झाली. या कार्यक्रमासाठी अध्यक्ष कॉम्रेड सुभाष लांडे, आनंदराव देसाई व कॉम्रेड सतीशचंद्र कांबळे, सरपंच उत्तमराव वरूटे, शेतकरी नेते मुकुंद पाटील, दादासो लाड यांच्यासह पुरोगामी चळवळीतील युवक कार्यकर्ते व महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.









