बेळगाव : लेफ्टनंट जनरल के. एस. ब्रार (पीव्हीएसएम, एव्हीएसएम) जनरल ऑफिसर कमांडिंग दक्षिण भारत विभाग यांनी 26 जून रोजी मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटरला भेट दिली. भेटीदरम्यान जेओसी रेजिमेंटल सेंटरच्या ऑपरेशनल तयारी आणि प्रशिक्षण माणकांची पाहणी केली. त्यांना प्रशिक्षण आणि प्रशासकीय पायाभूत सुविधांमध्ये वाढ करण्यात आलेल्या महत्त्वपूर्ण प्रगतीची माहिती देण्यात आली. विशेषत: अग्निवीर प्रशिक्षणाच्या संदर्भात जेओसीने प्रशिक्षण सत्राचे प्रत्यक्ष निरीक्षण केले. उत्कृष्टतेसाठी केंद्राच्या अटल वचनबद्धतेचे कौतुक केले. जेओसीने पायाभूत टप्प्यांपासून प्रशिक्षणात अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा समावेश करण्याच्या गरजेवर भर दिला.
जेणेकरून सैनिक भविष्यासाठी तयार असतील आणि विकसित होणाऱ्या युद्धभूमीच्या गतीशीलतेशी जुळवून घेण्यास सक्षम असतील. ब्रिगेडियर जॉयदीप मुखर्जी यांच्यासोबत जनरल ऑफिसरनी गॅरिसनच्या विविध स्टेशन युनिट्सना भेट देऊन एकूण कार्यात्मक समन्वय आणि तयारीचे मूल्यांकन केले. एक्स सर्व्हिसमन काँट्रीब्युटरी हेल्थ स्कीम, पॉलिक्लिनिकला भेट देताना जनरल ऑफिसरनी माजी सैनिकांशी संवाद साधला. तसेच एमएलआयआरसीतील आर्मी पब्लिक स्कूलला भेट दिली. विविध स्तरांवर क्रीडा क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा गौरव केला. त्यांच्या भेटीचा एक भाग म्हणून जेओसीने बेळगाव मिलिटरी हॉस्पिटलमध्ये नव्याने स्थापन झालेल्या बाह्यारुग्ण विभागाचे (ओपीडी) उद्घाटनदेखील केले.









