मिरज :
मराठा आरक्षणासाठी 29 ऑगस्टला अंतिम लढा दिला जाईल. मराठा-कुणबी एकच, हा अद्यादेशही काढावा लागेल. आरक्षण घेतल्याशिवाय मुंबई सोडणार नाही. राज्यातील करोडो मराठा यासाठी मुंबईत एकसंघ होतील. मराठा खासदार, आमदार, उद्योजक, शिक्षण सम्राटांसह अनेकांनी मराठा लेकरांच्या भवितव्यासाठी आंदोलनाला साथ द्यावी, असे आवाहन मराठा आरक्षण नेते मनोज जरांगे-पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना केले.
राज्यातील 58 लाख लोकांच्या नोंदी मराठा-कुणबी म्हणून झाल्या आहेत. जवळपास तीन कोटी लोक आरक्षणात आले आहेत. हा भक्कम पुरावा झाल्याने त्याचे कायद्यात रुपांतर करण्यास अडचण राहणार नाही. शासनाने वेळकाढूपणाची भूमिका घेत आमच्या नादाला लागू नये. आम्ही मुंबईत गनिमी काव्याने यश संपादन करु. आंदोलनासाठी करोडो मराठा मुंबईत एकवटतील आणि या आंदोलनाकडे जगाचे लक्ष जाईल, असेही जरांगे-पाटील म्हणाले.
मराठा तीनवेळा मागास म्हणून जाहीर झाला. पण आरक्षण मात्र मिळाले नाही. मराठ्यांची पोटजात कुणबी नाही का? मग विदर्भातील मराठ्यांना आरक्षण कसे? सध्याच्या ओबीसी समाजाकडे साखर कारखाने, उद्योगधंदे असताना त्यांना आरक्षण कसे? मराठा लेकरांना मोठेच होऊ द्यायचे नाही, असे काहींचे धोरण आहे. त्यासाठी आता एकसंघ होऊन लढा द्यावा लागेल, असा इशाराही त्यांनी दिला.
देशात राजकारण्यांपेक्षा प्रशासकांना किंमत आहे. मराठ्यांना राजकारणाच्या नादी लावून इतर समाजाने प्रशासनाची वरिष्ठ पदे बळकावली. हे मराठा जनतेच्या लक्षात आले आहे. पैशाबरोबर आरक्षणाचीही गरज आहे. मराठा लेकरांना अधिकारी होण्यापासून वंचित ठेवू नका. त्यासाठीच ही अंतिम लढाई आहे. जातीसाठी एक दिवस द्या, असे आवाहनही त्यांनी केले. आपली लेकरे-बाळे मोठी करण्यासाठी तुम्ही फक्त एक दिवस मुंबईला या, श्रीमंत मराठ्यापासून सर्वसामान्य मराठ्यापर्यंत सर्वांनी एक दिवस बाहेर पडावे, असे आवाहन त्यांनी केले.
प्रत्येक घर टू घर पिंजून काढा. खासदार, आमदारसह लोकप्रतिनिधींना आणि आपल्यातील प्रशासकीय अधिकाऱ्यांना एक दिवस समाजासाठी देण्याचे आवाहन करा. एक घर एक गाडी काढण्यासाठी मोहिम सक्तीने राबवा. गावागावातील मराठा 29 ऑगस्टला मुंबईत पोहोचला पाहिजे, याची दखल घ्या. हे करताना शांततेत झाले पाहिजे. मोर्चाला कोणतेही गालबोट लागले नाही पाहिजे. आपणास लेकरे मोठी करावयाची आहेत. त्यासाठी दुसऱ्याचे नुकसान होऊ नये, याचीही दखल घ्या, असे आवाहन त्यांनी केले.
- शासनाकडून फसवणूक
अनेक मंत्री आणि बुध्दीवंतांनी आंतरवाली सराटीला भेट देऊन आरक्षणाचा शब्द दिला. जबाबदार नेत्यांनी सहा महिन्यात आरक्षण देऊ, असा शब्द दिला होता. तत्कालिन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा प्रामुख्याने समावेश होता. आश्वासनाला दीड वर्षे लोटली पण अद्याप पुर्तता न करता आमची फसवणूक केली, असा आरोप करीत आता यातून माघार नाही, असा इशारा जरांगे-पाटील यांनी यावेळी दिला.








