कोल्हापूर / विशेष प्रतिनिधी :
नुसता जयंती नाला म्हटले की नाकाला कोल्हापूरकरांनी हात लावला आहे. कारण या नाल्यात साऱ्या गावाची घाण येऊन मिसळत आहे. पण वास्तव अनेकांना माहित नाही. आपण आता ज्याला जयंती नाला म्हणतो, ते मूळ लहानसे जयंती तीर्थ आणि ती जयंती नदी आहे. तिचा उगम कात्यायनी मंदिराच्या मागे एका छोट्या टेकडीजवळ झाला आहे. निसर्गाचे अमूल्य देणे असलेले हे तीर्थ म्हणजे कोल्हापूरच्या जलसंपत्तीची एक साक्ष आहे. पण आपण त्याचे रूपांतर नाल्यात केले आहे. आता आपण जरूर जागे झालो आहोत. पण या जयंती तीर्थाबद्दल किंवा त्या नैसर्गिक जलप्रवाहाबद्दल आस्था असलेले कोल्हापूरकर बुधवारी, 11 डिसेंबरला या जलप्रवाहाबद्दल कृतज्ञता व्यक्त करणार आहेत. त्यासाठी जलपूजनाचे आयोजन केले आहे. सांडपाण्याने भरलेला नाला पाहण्याची सवय झालेल्या कोल्हापूरकरांना मूळ जयंती नदीचे खळाळणारे स्वच्छ पाणी पाहायला मिळणार आहे.
जयंती तीर्थ किंवा जयंती नदी या नावानेच मूळ प्रवाह असलेला हा प्रवाह पुढेही असाच स्वच्छ वाहत रहावा. त्याच्यात जागोजागी मिसळणारे सांडपाणी रोखण्याचे सातत्याने प्रयत्न व्हावेत, हीच या जलपूजनामागची भावना आहे. बुधवारी आंतरराष्ट्रीय पर्वत डोंगर दिवस आहे आणि गंगेसह बहुतेक सर्व जलस्रोत पर्वत, डोंगराच्या रांगात आहेत. जयंती तीर्थाचा उगमही कात्यायनीच्या डोंगरात आहे. म्हणून तेथे या जलपूजनाचे आयोजन केले आहे. कोल्हापूर जिल्हा गिर्यारोहण असोशिएशनने यात पुढाकार घेतला आहे. पर्वत, डोंगरावर चढाई करणे हा तर संस्थेचा उद्देश आहे. पण डोंगरातून, डोंगराच्या पायथ्यापासून वाहणाऱ्या जलस्त्राsतांचे जतन करणे, हा देखील या जलपूजनाचा उद्देश आहे.
कोल्हापुरातला जयंती नाला आता शहराच्या मध्यभागातून वळसे–वळसे घेत वाहतो. कात्यायनीच्या डोंगरातून त्याचा मूळ प्रवाह आहे. तेथून तो कळंबा कारागृह, पाचगाव रस्ता, हॉकी स्टेडियम, यल्लमा देऊळ, हुतात्मा गार्डन, तेथे गोमती नाल्याला सोबत घेऊन हा नाला पुढे गणपती देऊळ, विल्सन पूल, संभाजी पूल, जुना पूलमार्गे प्रिन्स शिवाजी पुलाजवळ येतो. तेथे त्याचा उपसा होतो. व त्या सांडपाण्यावर प्रक्रिया केली जाते. हे पाणी स्वच्छ होते तोवर जयंती नदी म्हणूनच त्याची ओळख होती. पण मार्गात इतके सांडपाणी मिसळत गेले, की जयंती नदीचे रूपांतर सांडपाण्याच्या मोठ्या नाल्यात झाले. केवळ काठावरचा भाग नव्हे तर संलग्न इतर ठिकाणांहूनही सांडपाणी जयंती नाल्याकडेच वळवण्यात आले. उद्यमनगर, जवाहरनगर, एसटी वर्कशॉप, रेल्वे बोगीची स्वच्छता, केएमटी वर्कशॉप येथील पाणी जयंतीतच मिसळत राहिले. जयंती ही मूळ स्वच्छ पाण्याची नदी होती, हेच ही पिढी विसरली व जयंती नदीची ओळख जयंती नाला अशी पक्की झाली.
म्हटलं तर सर्व सांडपाणी रोखून जयंतीचा प्रवाह स्वच्छ ठेवणे हातात आहे. असोसिएशन ऑफ आर्किटेक्ट अँड इंजिनियर्सने महापालिकेच्या सहकार्याने तसे प्रयत्न सुरू केले आहेत. तत्कालीन महापालिका आयुक्त मंजुनाथ कलशेट्टी यांनी तर प्रत्येक रविवारी लोकसहभागातून श्रमदान करून हा नाला साफ ठेवण्याचा प्रयत्न केला होता. अर्थात त्याला मर्यादा होत्या. या नाल्यावर एसटीपी प्लांट उभा करून महापालिकेने सांडपाणी पूर्णपणे नदीत मिसळणार नाही, याची खबरदारी घेतली आहे. पण जयंती नाला म्हणून त्याची अजूनही ओळख कायम आहे. ती पुसण्याचीच गरज आहे.
शहराच्या मध्यभागातून वाहणारा हा नाला स्वच्छ खळखळणाऱ्या पाण्यानेच वाहता ठेवणे प्रयत्नांती शक्य आहे. हा प्रश्न तांत्रिक उपायाबरोबरच लोकांनी मनावर घेतला तरच त्यातून मार्ग निघण्यासारखा आहे. त्यामुळे जयंती नाला आपण ज्याला म्हणतो, तो मूळ शुद्ध खळखळणाऱ्या पाण्याचा प्रवाह कसा आहे, हे आपल्याला पाहायला मिळणार आहे.
कोल्हापूर जिल्हा गिर्यारोहण संस्थेने आपल्याला ही संधी बुधवारी मिळवून दिली आहे. त्यासाठी कळंबा कात्यायनी मंदिराजवळ बुधवारी सकाळी सात वाजता उपस्थित राहिले तर जयंती नदीचा हा खळाळता उगम पाहण्याची संधी आपल्याला मिळणार आहे.








