चला चॅम्पियन्स ट्रॉफीच्या विजयाची अंतिम घटिका जवळ आली. दोन तुल्यबळ संघ आमने-सामने ठाकणार आहेत. भारताचा अश्वमेधाचा घोडा उधळला आहे. तो रोखणार कोण, की उधळत राहणार याचे उत्तर आज आपल्याला मिळेल. ज्या पद्धतीने भारतीय संघ या पूर्ण स्पर्धेत खेळलाय ते बघून भारतीय संघाला काळा टीका लावावा, असं मनोमन वाटतं. जो संयम आणि आक्रमकता पूर्ण स्पर्धेत भारतीय संघाने दाखवलीय ती स्पर्धेच्या शेवटीही दाखवावी एवढीच माफक अपेक्षा.
या स्पर्धेत प्रत्येकाचा भारतीय संघाने हिशेब केलाय. सुऊवात बांगलादेशपासून झाली. आता वेळ न्यूझीलंडची. पूर्ण स्पर्धेत भारतीय संघाने भल्याभल्यांचा बाजार उठवला. 2019 मधील मार्टिन गप्टीलच्या अचूक फेकीचा वचपा आज भारतीय संघाला काढावा लागेल. या सामन्यात मात्र खऱ्या अर्थाने स्पिनर्स विऊद्ध स्पिनर्स हीच लढाई अपेक्षित आहे. जो स्पिनर्सला सक्षमतेने खेळेल तोच अंतिम सामन्यात उजवा ठरणार आहे. भारतीय संघाचा विचार केला तर ज्या पद्धतीने 2023 च्या विश्वचषक स्पर्धेत विराट कोहलीचा बोलबाला राहिला होता. नेमकी तीच कामगिरी विराटने या स्पर्धेत केली. ही कामगिरी ऐन मोक्याच्या क्षणी केली, हे विशेष. सद्य स्थितीत भारतीय क्रिकेटमधील तो भीष्माचार्य आहे असं म्हटलं तर वावगं ठरू नये. दुसऱ्या बाजूने श्रेयस अय्यर, हार्दिक पंड्या या मंडळींनी सहकलाकाराची भूमिका नजरेत भरण्यासारखी केली. चक्रवर्ती आणि शमी या दोघांनी प्रतिस्पर्धी संघाचं खऱ्या अर्थाने कंबरडं मोडलं.
क्रिकेटमध्ये चोकर्स म्हटलं की नाव येतं ते दक्षिण आफ्रिकेचं. चोकर्सच्या बाबतीत दुसरा नंबर लागतो तो न्यूझीलंडचा. बऱ्याच वेळा ते नॉकआऊट स्टेजला येऊन माघारी परतलेत. तुम्ही म्हणाल कसे, तर 2015 ची वर्ल्डकप फायनल, 2019 ची वर्ल्डकप फायनल आणि 2021 ची टी20 वर्ल्डकप फायनल या तीन आयसीसी इव्हेंट्सच्या अंतिम सामन्यात न्यूझीलंडच्या डोळ्यातून आपण अश्रू पाहिले होते. हे अश्रू होते कधी केन विल्यम्सन याच्या डोळ्यात तर कधी ब्रँडम मॅक्युलमच्या डोळ्यात. अर्थात आफ्रिकेचा तुलनात्मकदृष्ट्या विचार केला तर त्यांच्याकडे दोन आयसीसीच्या ट्रॉफी आहेत हे आपल्याला विसरून चालता येणार नाही. उद्या नेमक्या कुठल्या खेळपट्टीवर भारतीय संघाचा सामना होतोय हे महत्त्वाचं आहे. स्पर्धेतील लीग सामन्यात न्यूझीलंडविऊद्ध ज्या खेळपट्टीवर सामना झाला होता त्या खेळपट्टीवर सामना झाला तर खऱ्या अर्थाने दुधात साखर राहील.
झटपट क्रिकेटमध्ये मागील काही महिन्यांपासून आनंदी वातावरण आहे. अहमदाबादमधील तो एक सामना सोडला तर आपण सलग विजय मिळवत आलोय. टी20 विश्वचषक हा स्वल्पविराम होता. चॅम्पियन्स ट्रॉफी खऱ्या अर्थाने पूर्णविराम राहील. मी स्वत: क्रिकेटसाठी भावनिक आहे. जय-पराजय हा सामन्याचा एक हिस्सा असतो. परंतु सर्व काही सुरळीत होऊन ऐन मोक्याच्या क्षणी विचित्र घडलं की ते माझ्यासारख्या क्रिकेट विश्लेषकाच्या पचनी पडत नाही. असो. आज टीम इंडियाने पूर्ण चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये जी कामगिरी केली आहे त्याचीच ‘री’ भारतीय संघ आज ओढेल अशीच आपण अपेक्षा करूया. सरते शेवटी सद्यस्थितीत आम्हीच व्हाईट बॉल क्रिकेटचे बाप आहोत हे सांगण्याची नामी संधी भारताला आली आहे, एवढं मात्र खरं! शेवटी कोणीतरी म्हटलंच आहे ‘अंत भला तो सबकुछ भला’! भारताचा शेवट गोडच होईल अशी तूर्तास तरी अपेक्षा करत भारताला आपण विजयासाठी शुभेच्छा देऊयात.









