थँक्यू व्हेरी मच नेदरलँड्स. तुम्ही म्हणाल तुम्ही नेदरलँड्सचे धन्यवाद का मानता? कालच्या लेखात क्रिकेटची परिभाषा माझ्या शब्दात कथन केली होती. आणि अहो आश्चर्यम, ती तंतोतंत खरी ठरली. यावरुन एक मात्र खरं की माझ्यासारखा छोटा क्रिकेट विश्लेषक जे काही अंदाज बांधतोय, ते बऱ्याच अंशी खरे ठरु पाहतायत हेही नसे थोडके. असो.
माझ्या मागील तीस वर्षाच्या समालोचनाच्या कारकिर्दीत मी काही आंतरराष्ट्रीय कसोटी व एकदिवसीय सामन्यांचे प्रत्यक्ष धावते वर्णन आकाशवाणी समालोचन कक्षातून करताना विशेषत: सचिन तेंडुलकरचा ऑस्ट्रेलियाविरुद्ध वानखेडे स्टेडियमवरचा 101 वा कसोटी सामना, गुरुवर्य रमाकांत आचरेकर सरांची त्यांच्या निवासस्थानी घेतलेली मुलाखत ही माझ्यासाठी पर्वणी होती. रणजी करंडक, इराणी करंडकसारखे राष्ट्रीय स्तरावरचे क्रिकेटचे समालोचन आकाशवाणी समालोचन कक्षातून जवळून बघितले. तर बहुतांशी आंतरराष्ट्रीय सामने दूरदर्शनवर बघितले. परंतु या प्रदीर्घ कालावधीतील भारतीय क्रिकेटच्या काही पराभवाच्या जखमा माझ्या मनावर अजूनही तशाच आहेत. 1987 साली मनिंदर सिंगने पायावर घेतलेला तो चेंडू आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेला तो टाय सामना. सर्वश्रुत जावेद मियांदादचा तो षटकार. आणि 2019 च्या विश्वचषक स्पर्धेत न्यूझीलंड विरुद्ध सामन्यात मार्टिन गप्टीलची सीमारेषेवरून आलेली थेट फेक आणि धावबाद झालेला धोनी. आणि सरते शेवटी 2007 मधील विश्वचषक स्पर्धेतील बांगलादेशविरुद्ध झालेला पराभव. या सर्वांमध्ये बांगलादेशी जखम अजूनही भरून निघालेली नाही. सात जन्माचा वैरी असावा तसा तो 2019 च्या विश्वचषकानंतर आपल्याशी खेळलेला आहे. याच बांगलादेशला 1971 मध्ये भारतीय लष्कराने आपल्या प्राणांची आहुती देत त्यांना स्वतंत्र केलं. प्रेमात आणि युद्धात सर्व काही माफ असतं हे सर्वश्रुत आहे. परंतु क्रिकेटमध्ये नाही हे भारतीय संघ कदाचित विसरला असावा. असो.
बांगलादेश संघाचा विचार केला तर मागील चार सामन्यापैकी तीन सामन्यात त्यांनी भारताला पराभूत केले आहे. त्यापैकी आशिया चषकातील एक सामना आपल्याला आठवत असेल. (अर्थात त्या सामन्यात पाच दिग्गज खेळाडू नव्हते) भारत आणि बांगलादेश यांच्या पत्रकारांमध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. भारतात महत्वपूर्ण सामन्यात भारतीय संघ पराभूत झाला तर टीका करणाऱ्यांना उधाण येते. परंतु याउलट बांगलादेश संघ पराभूत झाल्यानंतर सुद्धा पत्रकार त्यांची पाठराखण करतात हे विशेष. बांगलादेशचा संघ बलवान निश्चितच नाही. परंतु शेअर मार्केटने जशी अचानक उसळी घ्यावी तशी उसळी बांगलादेश भारतीय संघाविरुद्ध घेताना वारंवार बघायला मिळाला आहे. माझ्या मते बांगलादेश विरुद्धच्या सामन्यात सूर्यकुमार यादवला संधी द्यायलाच हवी. त्याच्या बॅटमध्ये प्रचंड गुणवत्ता आहे. एक वर्षानंतर आलेला बुमराह सध्या तरी या स्पर्धेत फलंदाजांचा कर्दनकाळ ठरू पाहतोय. दुसऱ्या बाजूने आपले मंदगती गोलंदाज कुलदीप आणि जडेजा यांनी आपलं नाणं खणखणीत वाजवले आहे. भारतीय गोलंदाजांचे आणखीन एक वैशिष्ट्या म्हणजे तीनपैकी दोन सामन्यात भारतीय गोलंदाजेंनी प्रतिस्पर्धी संघाला ऑल आउट केले आहे. (पाकिस्तान व ऑस्ट्रेलिया). दुसऱ्या बाजूने बांगलादेशला न्यूझीलंडने पराभूत केल्यानंतर त्यांचा कर्णधार शकीब उल हसन त्याच सामन्यात जखमी झालाय ही निश्चित चिंतेची बाब. तो जर आज खेळला नाही तर त्यांची गोलंदाजी थोडी बोथट होऊ शकते. असो. या सामन्यात आपल्याला पूर्णत: आक्रमक व्हावेच लागेल. या सामन्यातील विजयाने आपल्याला बरेच हिशोब चुकते करता येतील. 2007 ची जखम अजूनही वाहत आहे. ही जखम भरून काढायची असेल तर आक्रमक पवित्रा आपल्याला घ्यावाच लागेल. त्याशिवाय कुठलाही पर्याय नाही. क्रिकेटमध्ये असं नेहमी म्हटलं जातं की प्रति आक्रमण करणे हीच मोठी सुरक्षा असते. भारतीय संघ या तंत्राचा वापर करतो की नाही हे बघणं औत्सुक्याचे ठरणार आहे. या विश्वचषकात अफगाणिस्तानचा इंग्लंडवरील विजय, ज्या देशांमध्ये फक्त सहा ते सात हजार क्रिकेटपटू आहेत अशा अंडरडॉग्स नेदरलँड्सने आफ्रिकेचा उडवलेला धुव्वा, हे आपल्याला चांगलंच आठवत असेल. असे विजय दिग्गज संघासाठी नेहमीच धोक्याची घंटा असतात. सरते शेवटी मी एवढेच म्हणेन जपून जपून जा रे, पुढे धोका आहे!









