शेवटी ग्रुपमध्ये टॉपर कोण याचे उत्तर आपल्याला काल मिळाले. हा सामना सुरू होण्याअगोदर माझ्या मनात एक वेगळीच भीती न्यूझीलंडविऊद्ध होती. न्यूझीलंड हा संघ शांत स्वभावाचा. ते जास्त वायफळ बडबडत नाहीत. बडबडतात त्यांची बॅट आणि बॉल. आज त्यांची बॅट पूर्णत: म्यान झाली. त्यांचे फलंदाज चक्र काही जोरात फिरवतील असं वाटलं होतं. परंतु भारतीय गोलंदाज चक्रवर्तीने चक्र हे भारतीय संघाच्या बाजूने फिरविले, तेही अगदी सहजतेने. न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी अतिशय छान गोलंदाजी करत भारतीय फलंदाजांना जखडून ठेवलं. त्यातच त्यांच्या क्षेत्ररक्षकाने टिपलेले अप्रतिम झेल दृष्ट काढण्यासारखे होते. विशेषत: विराट कोहलीच्या 300 व्या झटपट क्रिकेट सामन्यात फिलिप्सच्या त्या झेलाने जाँटी रोड्सची आठवण झाली.
3 बाद 30 वरून ज्या पद्धतीने श्रेयस अय्यर आणि अक्षर पटेल यांनी जो डाव सांभाळला त्याचे निश्चितच कौतुक करावे लागेल. श्रेयस अय्यर भारतासाठी एका छोट्या डिपॉझिटधारकसारखा आहे. ज्या ज्या वेळी भारतीय संघ अडचणीत आलाय त्या त्या वेळी श्रेयश अय्यरने ती धावाऊपी डिपॉझिट मोडून आपल्या संघाला सावरलंय. श्रेयस अय्यर बऱ्याच सामन्यात मैदानात मुख्य भूमिकेत असतो. परंतु वऊण चक्रवर्तीसारखे गोलंदाज येतात आणि त्याला साईड हिरो होण्याची वेळ येते. सुऊवातीला डाव सावरल्यानंतर शेवटी डाव पंक्चर होतो की काय असं वाटत असताना हार्दिक पंड्याच्या 45 धावा फोर व्हीलरमधल्या ‘स्टेफनी’सारख्या कामी आल्या. आज तीनऐवजी चार फिरकी गोलंदाज खेळविण्याचा निर्णय भारतीय संघाने घेतला. अर्थात हा निर्णय कमालीचा यशस्वी ठरला. स्पर्धा सुरू होण्याअगोदर बऱ्याच पत्रकारांनी पाच स्पिनर कशाला हवेत म्हणून बोटं मोडली होती. परंतु आज ती बोटं खऱ्या अर्थाने सरळ केली ती वऊण चक्रवर्तीने. एक-दोन नव्हे तब्बल पाच गडी बाद करत मला तुम्ही संघाच्या बाहेर ठेवू नकात असा धमकीवजा सल्ला त्याने भारतीय व्यवस्थापनाला दिला नसेल तरच नवल. 249 हा आकडा काही धावांचा डोंगर नव्हता. परंतु याच धावसंख्येसमोर अचूक टप्प्यावर आणि अचूक उंचीवर फलंदाजांना सहज ‘मामा’ बनवता येतं हे काल वरुण चक्रवर्तीने सिद्ध केलं. चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये मिळालेल्या संधीचं त्याने सोनं केलं. त्याचे चेंडू फलंदाजांना तर चकवत होतेच परंतु त्या पाठोपाठ यष्टीरक्षक के. एल. राहुलही चकत होता, हे विशेष. जोपर्यंत केन विल्यम्सन खेळपट्टीवर उभा होता तोपर्यंत किवींची तलवार तळपत होती. तो बाद झाल्यानंतर तलवार म्यान झाली.
असो. भारताने तीन निर्विवाद विजय मिळवत स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक मारली आहे, तीही अगदी ऊबाबात. तिन्ही विजय कसे अगदी फोटो फ्रेम करण्यासारखे. अर्थात आता गाठ आहे ती कांगारूंशी. झटपट क्रिकेटमधील 2023 विश्वचषक कांगारूंनी जिंकला हे अजूनही मला स्वप्नवत वाटतंय. पहिले दहा सामने जिंकून सर्व काही मनासारखे झाल्यानंतरसुद्धा शेवटचा सामना भारताच्या हातातून निसटला होता. सर्व काही अगदी मनासारखे झाल्यानंतरसुद्धा शेवटच्या सामन्यात भारताच्या मनासारखं झालं नाही. त्या स्पर्धेत शेवट गोड झाला नव्हता. त्या सामन्यानंतर ’कोण होतास तू काय झालास रे’ म्हणत भारतीय संघाला ट्रोल करण्यात आले होते. या स्पर्धेत शेवट गोड होण्यासाठी कांगारूंविऊद्ध विजय फार महत्त्वाचा आहे. किंबहुना या सामन्यातून आपल्याला बरेच जुने हिशेब चुकते करायचे आहेत. अहमदाबादमधील ट्रेविस हेडची ती डोकेदुखी संपवायची आहे. कठीण परिस्थितीतून आपल्या संघाला कसं बाहेर काढायचं हे ऑस्ट्रेलियन संघाला चांगलं अवगत आहे. सद्यस्थितीत ऑस्ट्रेलियन संघ तीन ते चार प्रमुख खेळाडूंविना या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये दमदार कामगिरी करतोय. त्यांना हलक्यात घेण्याची चूक भारतीय संघ निश्चित करणार नाही. युद्धामध्ये आक्रमण हेच मोठं स्वसंरक्षण असतं, ही नीती भारतीय संघाने वापरली पाहिजे. आयसीसी इव्हेंटमध्ये अंतिम सामन्याअगोदर ज्या ज्या वेळी ऑस्ट्रेलियन संघ भारताशी भिडलाय त्या त्या वेळी भारतीय संघाने कांगारूंना अस्मान दाखवलंय. कधी फलंदाज, कधी गोलंदाज तर कधी क्षेत्ररक्षक तर कधी तिघांचा एकत्र मिलाफ होत ऑस्ट्रेलिया संघाला पुरतं निराश केलंय. अर्थात याला इतिहास साक्ष आहे. ‘हा सूर्य हा जयद्रथ’ म्हणण्याचा हा तोच सामना आहे. या सामन्यात भारताने विजय मिळवला तर मागील सर्व हिशेब व्याजासहित चुकते होतील एवढं मात्र खरं!









