पत्रकार परिषदेत वॉर्ड समिती संघातर्फे आवाहन
बेळगाव : शहरातील प्रत्येक वॉर्डामध्ये दहा जणांची सिटीझन वॉर्ड कमिटी स्थापन करण्यात येणार आहे. या कमिटीच्या माध्यमातून जनतेच्या समस्या महापालिकेमध्ये पोहोचविल्या जाणार आहेत. त्यासाठी नागरिकांनी या समितीमध्ये आपला सहभाग दर्शवावा, यासाठी महापालिकेमधून अर्ज घेऊन तो भरून द्यावा, असे आवाहन बेळगाव वॉर्ड समिती संघाचे संचालक अनिल चौगुले यांनी केले आहे. हॉटेल मिलन येथे पत्रकार परिषद घेऊन त्यांनी वॉर्ड समितीबाबत माहिती देऊन हे आवाहन केले आहे. वॉर्ड समिती रचनेबाबत जनजागृती करण्यासाठी बेंगळूर येथील वॉर्ड समिती संघातर्फे ही जनजागृती करण्यात येत आहे. बेळगावसाठी अनिल चौगुले यांना संचालक म्हणून नियुक्त केल्याची माहिती राज्याचे समन्वयक शिवशंकर बी. ऐहोळे यांनी दिली. गेल्या दोन वर्षांपासून संपूर्ण राज्यामध्ये वॉर्ड समिती रचनेबाबत आम्ही जनजागृती करत आहे. राज्यातील महापालिकांच्या अखत्यारिमध्ये आम्ही ही जनजागृती करत आहोत. त्याला प्रतिसाद उत्तम मिळत आहे.
बेळगाव महानगरपालिकेचे आयुक्त अशोक दुडगुंटी यांनी याबाबत प्रत्येक वॉर्डामध्ये वॉर्ड समिती रचना करण्यासाठी पाऊल उचलले आहे. 9 ऑगस्टपासून त्यांनी अर्जांचे वितरण सुरू केले आहे. 29 ऑगस्टपर्यंत अर्ज दाखल करता येतात. तेव्हा प्रत्येकाने या समितीमध्ये सहभाग दर्शविण्यासाठी पुढे यावे, असे त्यांनी सांगितले. एकूण 10 जणांची वॉर्ड कमिटी राहणार आहे. त्यामध्ये सामान्य 3, महिला सदस्य 3, एनजीओ किंवा नोंदणीकृत असोसिएशन यांचे 2 सदस्य, अनुसूचित जाती-जमाती तसेच इतर मागास असे 2 सदस्य मिळून एकूण 10 सदस्य या समितीमध्ये राहणार आहेत. समितीच्या अध्यक्षपदी संबंधित वॉर्डाचे नगरसेवक राहणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. वॉर्डामध्ये निर्माण झालेल्या समस्या दूर करण्यासाठी लोकसभेमध्येच याचे विधेयक मंजूर झाले आहे. त्यानुसारच प्रत्येक महापालिकेच्या अखत्यारिमध्ये या समिती नेमण्यात येत आहेत. यावेळी सदस्य डॉ. संजयकुमार दिवेकर, दिनेश काळे, मैनुद्दीन खरेदीवाले, स्टीफन डिकोस्टा, प्रमोद गुंजीकर, अरविंद कपाडीया, प्रिया पुराणिक आदी उपस्थित होते.









