वार्ताहर /कंग्राळी बुद्रुक
गणपती बाप्पा मोरया पुढच्यावर्षी लवकर या.. च्या भक्तीपूर्ण जयघोषात व फटाक्यांच्या आतषबाजीमध्ये कंग्राळी बुद्रुक यमनापूर, गौंडवाड, शाहूनगर परिसरामध्ये शनिवारी सार्वजनिक व घरगुती मूर्ती आपल्या लाडक्या बाप्पाला मोठ्या भक्तिभावाने व जड अंतकरणाने निरोप देण्यात आला. 27 ऑगस्टला कंग्राळी परिसरात घरगुती व सार्वजनिक मूर्तींचे प्रतिष्ठापना केल्यानंतर गेल्या आठवडाभर कंग्राळी परिसरातील सर्व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने धार्मिक भजन, कीर्तनाच्या कार्यक्रमाबरोबर महाप्रसादाचे वितरण केले. परिसरातील हजारो भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. परिसरामध्ये यावर्षी पाच दिवस, सात दिवस, नऊ दिवस अनेक घरगुती गणपतींचे विसर्जन केल्याचेही दिसून आले. गावाजवळील किगळी तलाव, मराठी शाळेजवळील सार्वजनिक विहिरीमध्ये भक्तांनी घरगुती गणेशमूर्तीबरोबर सार्वजनिक गणेशमूर्तींचे विसर्जन केल्याचे दिसून आले.
ग्रा. पं.च्या वतीने क्रेनची सोय
मराठी शाळेजवळील सार्वजनिक विहिरीमध्ये सार्वजनिक गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यासाठी ग्रा.पं. च्या वतीने क्रेनची व्यवस्था केल्यामुळे भक्तांतून समाधान व्यक्त करण्यात आले. तसेच हॅलोजन लाईटचीही व्यवस्था केल्यामुळे रात्रीच्यावेळी सार्वजनिक गणेशमूर्ती विसर्जन करतेवेळी भक्तांची चांगली सोय झाल्यामुळे समाधान व्यक्त करण्यात आले.
शाहूनगर परिसरातील गणेशभक्तांची चांगली सोय
कंग्राळी बुद्रुक गावाजवळील तलावमध्ये तसेच किगदी तलावमध्ये शाहूनगर परिसरातील घरगुती गणेशभक्तांची विसर्जनाची चांगली सोय झाल्याचे दिसून आले. यापूर्वी त्यांना कंग्राळी खुर्द मार्कंडेय नदीवर जावे लागत होते. परंतु यावर्षी या दोन्ही तलावामध्ये विसर्जन करता आल्यामुळे या भागातील गणेश भक्तांतून समाधान व्यक्त करण्यात आल्याचे दिसून येत होते.
कलमेश्वर गल्लीतील सार्वजनिक गणेशमूर्तीचे विसर्जन
येथील कलमेश्वर गल्लीतील सार्वजनिक गणेशमूर्तीचे रविवारी सकाळी 8.30 वा. मोठ्या भक्तीपूर्ण वातावरणात व जड अंत:करणाने विसर्जन करण्यात आले.
कंग्राळी खुर्द, अलतगे परिसर
कंग्राळी खुर्द, अलतगा, जाफरवाडी परिसरातील घरगुती व सार्वजनिक गणपती मूर्तीचे शनिवारी जड अंत:करणाने कंग्राळी खुर्द गावाजवळून वाहणाऱ्या मार्कंडेय नदीच्या जुन्या पुलावरून तसेच अलतगे फाटाजवळील बंधाऱ्यावर मार्कंडेय नदीपात्रात गणपती बाप्पा मोरया… पुढच्या वर्षी लवकर या… या जयघोषात निरोप देण्यात आला.
जाफरवाडी, अगसगे
दरवर्षी कंग्राळी खुर्द, अलतगे, मार्कंडेय नगर, ज्योतीनगर, बेळगाव शहरातील घरगुती गणपती, जाफरवाडी अगसगे आदी भागातील गणेशभक्तांना कंग्राळी खुर्द गावाजवळून वाहणारी मार्कंडेय नदी पात्रात घरगुती व सार्वजनिक गणेशमूर्ती विसर्जन करणे चांगले सोयीचे होत आहे.
नदीकाठावर विद्युत लाईटचे चांगले नियोजन
कंग्राळी खुर्द गावाजवळून वाहणारी मार्कंडेय नदी पात्रामध्ये कंग्राळी खुर्द, परिसरातील घरगुती व सार्वजनिक गणेशमूर्ती गावाजवळीत जुन्या पुलावर व अलतगे परिसर जवळील बंधारा परिसर ग्रा. पं.च्या वतीने विद्युत दिवे लावून रात्रीच्यावेळी प्रखर उजेडाची सोय केली होती. तसेच निर्माल्य नदीत न टाकता एका ठिकाणी टाकण्याचेही नियोजन करण्यात आले होते. यामुळे गणपती विसर्जन करणे भक्तांना सोयीचे झाल्याचे दिसून आले.









