राहुल गांधींच्या दौऱ्यावर के. कविता यांची खोचक टिप्पणी
राहुल गांधी हे रविवारी तेलंगणाच्या दौऱ्यावर होते. त्यांच्या या दौऱ्यावरून बीआरएस आमदार के. कविता यांनी खोचक टिप्पणी केली आहे. राहुल गांधी आमचे अतिथी आहेत. ते येथे येतात, बिर्याणी अन् पान खातात. गांधी परिवाराने नेहमीच तेलंगणाच्या जनतेला धोका दिला आहे. इंदिरा गांधी यांना तेलंगणची गरज होती, तेव्हा येथील लोकांनी गांधी परिवाराला साथ दिली. परंतु गांधी परिवाराने कधीच तेलंगणाला साथ दिली नसल्याची टीका के. कविता यांनी केली आहे.
काँग्रेसचे राष्ट्रीय महासचिव के.सी. वेणुगोपाल यांनी या निवडणुकीत भाजप आणि बीआरएस एकत्रितपणे निवडणूक लढवत असल्याचा आरोप केला होता. यावर के. कविता यांनी प्रत्युत्तर दिले आहे. राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांच्याविरोधातही ईडीने गुन्हा नोंदविला आहे, परंतु त्यांना अटक करणे टाळले आहे. मग आम्ही भाजप आणि काँग्रेस यांच्यात साटंलोटं असल्याचे मानू शकतो का असे प्रश्नार्थक विधान कविता यांनी वेणुगोपाल यांना उद्देशून केले आहे.









