निदर्शक शिक्षकांना ममता बॅनर्जींचे आवाहन
वृत्तसंस्था/ कोलकाता
पश्चिम बंगालमध्ये शिक्षक भरती वाद वाढत चालला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर सुमारे 26 हजार शिक्षक आणि अन्य कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या रद्द झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर हे शिक्षक निदर्शने करत आहेत. तर मंगळवारी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी या शिक्षकांना शाळांमध्ये परतण्याचे आवाहन करत सरकार त्यांच्या वेतनाची व्यवस्था करणार असल्याचा दावा केला आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या एका निर्णयानंतर नोकरी गमाविलेले हजारो शिक्षक निदर्शने करत आहेत. सॉल्ट लेक येथील पश्चिम बंगाल शालेय सेवा आयोगाच्या मुख्यालयाबाहेर या शिक्षकांनी मंगळवारीही निदर्शने केली. कोण कलंकित आहे आणि कोण नाही याची चिंता तुम्हाला करण्याची गरज नाही. तुमच्याकडे नोकरी आहे का नाही आणि तुम्हाला वेळेवर पगार मिळतोय की नाही केवळ याचीच चिंता तुम्ही करा. कलंकित आणि निर्दोष शिक्षकांची ओळख पटविणारी यादी सरकार आणि न्यायालयांकडे आहे असा दावा ममता बॅनर्जी यांनी शिक्षकांना उद्देशून केला आहे.
संबंधितांची नोकरी सुरक्षित असून वेतन मिळणार असल्याचे आश्वासन मी देते. कृपया स्वत:च्या शाळांमध्ये परत जा आणि वर्ग पुन्हा सुरू करा. मी सोमवारी रात्री यासंबंधी अनेकांशी चर्चा केली असून आम्ही सर्वजण तुमच्यासोबत आहोत असे ममता बॅनर्जी यांनी मिदनापूर येथील एका प्रशासकीय कार्यक्रमात शिक्षकांना उद्देशून म्हटले आहे.
नोकरी गमाविलेल्या ग्रूप सी आणि डी च्या कर्मचाऱ्यांसाठी देखील एक पुनर्विचार याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केली जाणार आहे आणि तोपर्यंत आमच्यावरील विश्वास कायम ठेवा असे ममता बॅनर्जी यांनी निदर्शक कर्मचाऱ्यांना उद्देशून म्हटले आहे. तर मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मुर्शिदाबादच्या अशांत क्षेत्रांचा दौरा करणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
पश्चिम बंगालमध्ये एकीकडे शिक्षकांची निदर्शने सुरू आहेत, तर दुसरीकडे मुर्शिदाबादच्या दंगलींवरून ममता बॅनर्जी सरकार टीकेला सामोरे जात आहे. तृणमूल काँग्रेसच कट्टरवाद्यांना चिथावणी देत असल्याचा आरोप भाजपने केला आहे. तर वक्फ कायद्याच्या विरोधात झालेल्या निदर्शनानंतर मुर्शिदाबाद येथील दंगलीत 3 जणांना जीव गमवावा लागला असून शेकडो लोकांना बेघर व्हावे लागले आहे.









