कोलवाळात 101 तर, म्हापशात 23 जणांना अटक : तब्बल 39 जणांकडे नव्हती कोणतीही कागदपत्रे
प्रतिनिधी / म्हापसा
जी-20 परिषदेच्या पार्श्वभूमीवर कोलवाळ पोलिसांनी काल गुऊवारी सकाळी मुशीरवाडा परिसरात कॉम्बिंग ऑपरेशन राबवित भाड्याने राहत असलेल्या बिगरगोमंतकीयांची कसून चौकशी केली. म्हापसा पोलिसांनीही आपल्या कार्यक्षेत्रात धरपकड करुन चौकशी केली, अशी माहिती पोलीस उपअधीक्षक जिवबा दळवी यांनी दै. ‘तऊण भारत’ला दिली. कोलवाळ पोलिसांनी 101 जणांना ताब्यात घेऊन स्थानकावर आणले. त्यातील 39 जणांकडे आवश्यक कागदपत्रे नव्हती. या सर्वांना सीआरपीसीअंतर्गत अटक करून नंतर म्हापसा एसडीएमसमोर हजर करण्यात आले. पोलीस निरीक्षक सोमनाथ माजिक, उपनिरीक्षक मंदार नाईक, कुणाल नाईक, साहाय्यक उपनिरीक्षक रामचंद्र सावंत, संतोष आर्लेकर व इतर कर्मचाऱ्यांनी या मोहिमेत भाग घेतला.

तब्बल 39 जणांकडे नव्हती कागदपत्रे
यासंदर्भात माहिती देताना कोलवाळ पोलीस निरीक्षक सोमनाथ माजिक म्हणाले, मुशीरवाडा परिसरात सकाळी 6 वाजल्यापासून कॉम्बिंग ऑपरेशन राबविले. गोव्यात जी-20 परिषदेच्या येत्या 17, 18 व 19 एप्रिलला बैठका होत आहेत. त्यानुसार वरिष्ठांच्या सूचनेनुसार हे ऑपरेशन राबविण्यात आले. मध्यंतरी ‘लाला की बस्ती’मध्ये अशाच प्रकारे मोहीम राबविली होती. या मोहिमेचा असा उद्देश होता की, विविध राज्यांतून लोक गोव्यात येऊन वास्तव्य करतात. मात्र त्यांच्याकडे आवश्यक कागदपत्रे किंवा इतर दस्तावेज नसतात आणि अनेकदा या बिगरगोमंतकीयांचा मोठ्या गुन्ह्यांमध्येही समावेश असतो, त्यांचा शोध घेणे आणि त्यांच्यावर कारवाई करणे हे गरजेचे असते. कोलवाळमध्ये अशा 101 जणांना ताब्यात घेऊन स्थानकावर आणले असता त्यातील 39 जणांकडे आवश्यक कागदपत्रे नसल्याने त्यांना अटक करण्यात आली.
म्हापसा पोलीस क्षेत्रातही धरपकड
म्हापसा येथील पोलिसांनी आपल्या कार्यक्षेत्रात शांतता व सुव्यवस्था राखण्याच्या हेतूने दोन सराईत गुंडांसह 21 जणांना पकडून चौकशी केली. सातजणांना प्रतिबंधक कारवाई म्हणून अटक केली आहे, अशी माहिती निरीक्षक परेश नाईक यांनी दिली.
उत्तर गोवा पोलिसांनी मंगळवारपासून गुन्हेगारांची तसेच सार्वजनिक ठिकाणी उपद्रव ठरणाऱ्यांची धरपकड सुरु केली आहे. भाडेकरुंची पडताळणी मोहीम सुरू केली आहे. यानुसार म्हापसा पोलिसांनी बुधवारी कुस्टा उर्फ सिद्धू विर्डीकर व रफिक बेनकीपूर या दोन सराईत गुन्हेगारांना ताब्यात घेऊन चौकशी करुन त्यांची सुटका केली. सीआरपीसी कायद्याखाली 1 व भारतीय दंड संहितेच्या कलम 34 (4) अंतर्गत सहा जणांना अटक केली. सीआरपीसी कायद्याखाली अटक केलेल्या संशयिताला उपजिल्हाधिकाऱ्यांमार्फत तर भारतीय पोलीस कायद्यांतर्गत अटक केलेल्या सहा जणांची म्हापसा न्यायालयामार्फत सुटका करण्यात आली. तसेच 10 समाजविरोधी घटकांसह 14 जणांना पकडून त्यांना समज देऊन सुटका करण्यात आली. शिवाय 18 भाडेकरूंची पडताळणी करण्यात आली. पोलीस उपअधीक्षक जिवबा दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक परेश नाईक यांनी ही कारवाई केली.









