प्रतिनिधी/ बेळगाव
बदलत्या काळात सणांचे व उत्सवांचे स्वरुप हे ‘साजरे करणे’ असे असले तरी त्यांचा मूळ हेतू स्नेहभाव वाढविणे, याबरोबरच राबणाऱ्या हातांना काम मिळणे हा आहे. नागपंचमी, कृष्ण जन्माष्टमी, गणेशचतुर्थी, नवरात्र, दिवाळी यामुळे कुंभार आणि मूर्तिकारांना काम मिळते. सणांच्या या मांदियाळीमध्ये दिवाळीला विशेष मान आहे. त्यामुळेच या निमित्ताने अनेक हातांना काम मिळून त्यांच्या खिशामध्ये चार पैसे खुळखुळू लागतात.
दिवाळीच्या निमित्ताने पणत्या, आकाशदिवे याबरोबरच सजावटीच्या साहित्यालाही मागणी असते. यामध्ये सध्या शहरात विविधरंगी आणि डोळ्यांना आल्हाद देणारी तोरणे लक्ष वेधून घेत आहेत. बाजारपेठेत कोठेही फेरफटका मारला तरी कृत्रिम माळा, तोरण आणि फ्लॉवरपॉट विकणारे विक्रेते सर्वत्र दिसत आहेत.पांगुळ गल्ली येथे तर या साहित्याच्या विक्रेत्यांनी गर्दी केली असून त्यांच्याकडील रंगीबेरंगी माळा, हार व फुले लक्ष वेधून घेत आहेत. विशेष नोंद घेण्याजोगी बाब म्हणजे केवळ हे साहित्य घेऊन दावणगेरीहून मजल दरमजल करत ही मंडळी बेळगावला आली आहेत. साधारण 15 ते 20 जणांचा हा एक गट असून आपण हे साहित्य मुंबईहून मागविल्याचे ते सांगतात. विक्रेत्यांपैकी बहुतांशी महिला असून कलखांब येथे एक झोपडीवजा तंबू उभारून ही मंडळी राहत आहेत.दावणगेरी हे खरे तर फुलांचे गाव. त्यामुळे कदाचित या कृत्रिम फुलांना तेथे मागणी नसावी. म्हणूनच दावणगेरीपेक्षा बेळगावमध्ये आमच्या साहित्याची विक्री अधिक होते, असे या महिला सांगतात. तुम्हाला दिवाळी महत्त्वाची नाही का? असे विचारता आमच्याकडील हार, तोरण विकले गेल्यानंतर हाती चार पैसे आले तर तोच दिवस आमच्यासाठी दिवाळी, असे त्या सांगतात.









