इचलकरंजीतील ‘डीकेटीई’च्या डॉ. गौरी कुलकर्णी यांचे संशोधन
शेतातील टाकाऊ वस्तूपासून निर्माण केले विविधरंगी धागे
इचलकरंजीः संजय खूळ
केळीचे खुंट, पपईचे बुंधे आणि नारळापासून मिळणारा काथ्या यांचा उपयोग करून त्यापासून अत्याधुनिक रंगीत धागे तयार करणे आता सहज शक्य होणार आहे. डी. के. टी. इन्स्टिट्यूटमधील रसायनशास्त्र विभागाच्या प्रा. डॉ. गौरी कुलकर्णी यांनी याबाबतचे महत्त्वपूर्ण संशोधन केले आहे. या संशोधनामुळे शेतात तयार होणाऱ्या कचऱ्याला पुन्हा एकदा महत्त्व प्राप्त होणार आहे.
शेतीतील उत्पादने काढल्यानंतर त्यापासून विविध कचरा (अवशेष) शिल्लक राहतो. यात पाने, देठे, मुळे, पिकांची धाटे, बी-बियाणांचा भुसा इत्यादींचा समावेश होतो. एकतर हे अवशेष जाळले जातात किंवा जमिनीत पुरून त्यापासून खत तयार केले जाते. कचरा जाळल्यामुळे हवेचे प्रदूषण होते आणि जमिनीत गाडून त्याचे खत तयार करताना काही रासायनिक द्रव्ये त्यात मिसळावी लागतात. त्यामुळे मातीची गुणवत्ता बिघडते, पाण्याचेही प्रदूषण होते.
महाराष्ट्रात प्रामुख्याने ऊस, तांदूळ, मका, ज्वारी, बाजरी, डाळी, सोयाबीन आणि विविध फळांचे पीक घेतले जाते. राज्यातील 230.40 लाख हेक्टर जमिनीतून निघणाऱ्या विविध उत्पादनांतून सुमारे 109.58 मिलियन टन इतका शेतीतील कचरा (अवशेष) शिल्लक राहतो. या शेती कचऱ्यावर मात करण्यासाठी विविध संशोधक संशोधन करीत आहेत. त्यात प्रामुख्याने प्रदूषण कमी करणे, कचरा अवशेषातील काही भाग पुन्हा वापरणे आणि पुनर्प्रक्रिया करणे यांबाबत त्यांनी संशोधन सुरु केले.
संशोधनात शेती उत्पादनातील केळीचे खुंट (सोट), पपयाचे बुंधे आणि नारळापासून मिळणारा काथ्या यांचा उपयोग केला आहे. केळीचे खुंट वाळवून त्यानंतर त्याचे मशीनवर धागे काढले. त्यावर रासायनिक प्रक्रिया करून त्यातील लिग्निन हा घटक काही प्रमाणात काढून टाकला. अशीच प्रक्रिया पपयाचे बुंधे आणि नारळाच्या काथ्यावर देखील केली. प्रक्रिया करताना धागे कमकुवत होणार नाहीत याची काळजी प्रामुख्याने घेतली. यामध्ये मिळालेल्या धाग्यांमध्ये सेल्युलोजचे प्रमाण अधिक असल्यामुळे त्यांचा उपयोग वस्त्राsद्योगामध्ये होऊ शकतो.
सध्या प्रोसेस हाऊसमधून बाहेर पडणाऱ्या पाण्यामध्ये बराचसा रंग तसाच राहिलेला असता . हा रंग पाण्यातून वेगळा करण्यासाठी वरील प्रक्रियेत मिळालेल्या धाग्यांचा उपयोग झाला. मुख्यत: रिअॅक्टिव्ह डाईज जे सुती कापड रंगवण्यासाठी वापरले जातात आणि पाण्यात विरघळल्यावर सहजासहजी वेगळे करता येत नाहीत अशा रंगांना पाण्यातून वेगळे करण्यासाठी हे धागे प्रभावी असल्याचे दिसून आले. या रंगीत धाग्यांपासून आकर्षक असे रंगीत बोर्ड तयार होऊ शकतात. या बोर्डना कीड लागण्याची शक्यता खूपच कमी असते. हे धागे मजबूत असल्यामुळे तयार झालेले बोर्ड वजनाला कमी असूनही सहजासहजी तुटत नाहीत, लवचिक राहतात. असे बोर्ड पॅकिंग मटेरियल तसेच इंटिरिअर डेकोरेशनसाठी वापरता येऊ शकतात. या संशोधन प्रकल्पात डॉ. जयकुमार पाटील, डॉ. राजेंद्र कुंभार आणि डॉ. संदीप साबळे यांचे मार्गदर्शन लाभले.
शिल्लक राहणाऱ्या धाग्यांचाही विविध कारणांसाठी वापर
या पूर्ण प्रकल्पामध्ये पर्यावरणास हानी करणाऱ्या कोणत्याही रसायनांचा वापर न करता शेती आणि फळबागातील घनकचऱ्यापासून दूषित पाण्यातील हानिकारक रंग यशस्वीपणे वेगळे करण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्याचप्रमाणे शिल्लक राहणाऱ्या धाग्यांपासून स्पिनेबल रंगीत यार्न ज्याचा उपयोग ज्यूटला पर्यायी धागा म्हणून आपण करू शकतो असे धागे बनवणे शक्य झाले. या धाग्यांपासून सुंदर, कलाकुसरीच्या बॅग्स तयार होऊ शकतात. या बॅगना परदेशात खूपच मागणी आहे. ध्वनीरोधक शीट तयार करण्यासाठीही या धाग्यांचा उपयोग होऊ शकतो. असे ध्वनीरोधक शीट इंटिरिअर डेकोरेशन आणि सिनेमागृहांसाठी उपयोगी होऊ शकतात.
डॉ. गौरी कुलकर्णी








