वृत्तसंस्था / नवी दिल्ली
अंध महिलांची पहिली टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धा भारतात आयोजित केली असून या स्पर्धेत पाकच्या सामन्यांसाठी कोलंबो हे त्रयस्थ ठिकाण म्हणून निवडण्यात आले आहे.
सुरूवातीला काठमांडूची त्रयस्थ ठिकाण म्हणून निवड केली होती. पण अलिकडेच नेपाळमध्ये झालेल्या भीषण हिंसाचार घटनांमुळे हे ठिकाण बदलण्यात आले. सोमवारी विश्व अंध क्रिकेट मंडळाच्या कार्यकारी समितीच्या झालेल्या बैठकीमध्ये नेपाळमधील काठमांडूच्या जागी लंकेतील कोलंबोची त्रयस्थ ठिकाण म्हणून निवड करण्यात आली. सदर स्पर्धा 11 ते 25 नोव्हेंबर दरम्यान होणार असून नवी दिल्ली आणि बेंगळूर येथे या स्पर्धेतील सामने खेळविले जातील. या स्पर्धेत प्राथमिक फेरीतील 21 सामने, दोन उपांत्य फेरीचे आणि त्यानंतर अंतिम फेरीचा सामना होईल. या स्पर्धेतील सामने नवी दिल्ली, बेंगळूर आणि कोलंबो येथे आयोजित केले असल्याची माहिती अखिल भारतीय अंध क्रिकेट संघटनेचे चेअरमन महांतेश किवडसन्नवर यांनी दिली आहे. या स्पर्धेमध्ये भारत, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, नेपाळ, पाक, लंका आणि अमेरिका यांचा समावेश आहे.









