कमीतकमी 7 जणांचा मृत्यू
वृत्तसंस्था/ बोगोटा
कोलंबियात झालेल्या साखळी बॉम्बस्फोटांमुळे मोठी दहशत निर्माण झाली आहे. देशाच्या कॅली शहर आणि काउका प्रांतात बंडखोर समुहांनी पोलीस स्थानकांनजकी बॉम्बस्फोट घडवून आणले. या स्फोटांमध्ये कमीतकमी 7 जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये दोन पोलीस अधिकाऱ्यांचा समावेश आहे. तर 28 जण जखमी झाले आहेत. कोलंबियाचे सैन्य आणि पोलीस विभागाने याला दहशतवादी हल्ला संबोधिले आहे.
देशात कमीतकमी 24 हल्ले झाले असून यात कारबॉम्बस्फोट, शस्त्रास्त्रांनी गोळीबार आणि विस्फोटक उपकरणे फेकण्याचा प्रकार सामील आहे. या हल्ल्यांमागे एस्टाडो मेयर सेंट्रल-फार्क समुहाचा हात असल्याचे सैन्य आणि पोलिसांकडून सांगण्यात आले. 2016 मध्ये कोलंबिया सरकारसोबत स्वाक्षरी केल्यावरही समुहापासून वेगळे होणाऱ्या सदस्यांनी या संघटनेची स्थापना केली होती.
परंतु एस्टाडो मेयर सेंट्रल समुहाने या हल्ल्यांची जबाबदारी स्वीकारलेली नाही. समुहाने कोलंबिया सरकारवर शांतता प्रक्रियेचा आदर न करणे आणि त्यापासून मागे हटण्याचा आरोप केला आहे. तसेच लोकांना गोळीबारापासून वाचण्याचा सल्ला दिला आहे.









