डबल इंजिन सरकारवर काँग्रेसचे टीकास्त्र : मुख्यमंत्री आत्मविश्वासाने खोटे बोलत असल्याचा आरोप
पणजी : कोळसा हाताळणीच्या नावाखाली डबल इंजिन सरकारने जिंदाल, अदानी यांच्याशी हातमिळवणी केली असून एमपीटीचे एकूणएक बर्थ कोळशासाठी देण्यात आल्यामुळे आता खनिज निर्यातीसाठी जागाच शिल्लक राहिलेली नाही. त्यावरून खाणी सुरू करणार असल्याचे सांगून मुख्यमंत्री प्रमोद सावंत आत्मविश्वासाने खोटे बोलत असल्याचे सिद्ध होत आहे, अशी कठोर टीका काँग्रेस प्रवक्ते कॅप्टन व्हेरियाटो फर्नांडिस यांनी केली आहे. शुक्रवारी पणजीत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. त्यावेळी खजिनदार ऑर्विल रॉड्रिग्ज यांचीही उपस्थिती होती. यापूर्वी कोळसा हाताळणीस विरोध होत असताना हेच मुख्यमंत्री काही वर्षांनंतर कोळसा हाताळणीचे प्रमाण हळुहळू कमी करत पूर्णपणे बंद करणार असल्याचे सांगत होते. परंतु स्वत:च्याच आश्वासनाच्या नेमके उलट वागत त्यांनी प्रत्येकवेळी वाढीव हाताळणीस मान्यता दिली व आता तर एकेक करत सर्व बर्थ त्यांच्या हवाली करून जवळजवळ संपूर्ण एमपीटीच कोळसा हाताळणीसाठी दिली आहे. अशावेळी भविष्यात राज्यातील खाण व्यवसाय सुरू झाल्यास खनिज निर्यात कुठून करणार, असा सवाल फर्नांडिस यांनी उपस्थित केला.
हा तर अदानींसाठी पायघड्या घालण्याचाच प्रकार
एवढेच नव्हे तर या पोर्टच्या बर्थ क्र. 8 व 9 तसेच बार्ज जेटीचा विस्तार करण्यास पर्यावरणीय ना हरकत दाखला मिळवण्यात आला तो सुद्धा कोळसा हाताळणीसाठीच असल्याचा दावाही फर्नांडिस यांनी केला आहे. ऑस्ट्रेलियातील कोळशाची एक खाण अदानी कंपनीने विकत घेतली आहे. याच कंपनीचे कर्नाटकात लोह उत्पादन प्रकल्प असून त्यांच्यासाठीच हा कोळसा गोवामार्गे नेण्यात येणार आहे. त्यासाठी रेल्वे मार्गाचेही दुपदरीकरण तसेच राष्ट्रीय महामार्गाचा विस्तार आणि ऊंदीकरणही करण्यात आले. एवढ्यावरच न थांबता मोठी जहाजे थेट मुरगांव बंदरात आणता यावी यासाठी जुवारी नदीतील गाळही उपसण्यात आला. आता समस्त वास्कोवासीय आणि उर्वरित गोमंतकियांना वेठीस धऊन मुरगाव जेटीचा विस्तार करण्यात येणार आहे. यापूर्वीच 5 व 6 या क्रमांकाच्या जेटी जेटी जिंदाल यांच्या ताब्यात देण्यात आल्या आहेत. आता उर्वरित जेटीही त्यांनाच देण्याचे घाटत असून परिणामी संपूर्ण एमपीटीच अदानींच्या घशात घालण्याचे प्रयत्न सुरू आहेत, असा दावाही फर्नांडिस यांनी केला आहे. या एकूण प्रकाराविरोधात आता पुन्हा एकदा समस्त गोमंतकियांना रस्त्यावर उतरावे लागेल, असे पुढे बोलताना फर्नांडिस यांनी म्हटले आहे.









