चिपळूण :
मुंबई-गोवा महामार्गावरील सावर्डे बाजारपेठेत उभ्या असलेल्या ट्रेलरला मागाहून दुचाकीची धडक बसून यात अजय अशोक सुतार (29, वालोटी) या दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी सकाळी 10.45 वाजण्याच्या सुमारास घडली. हा दुचाकीस्वार चिपळूण तालुक्यातील वालोटी गावातील असून तो दुचाकीने संगमेश्वर येथे जात होता. या अपघातप्रकरणी ट्रेलर चालकावर सावर्डे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पृथ्वी बाबूनाथ (45, राज्यस्थान) असे गुन्हा दाखल झालेल्या ट्रेलर चालकाचे नाव आहे. अजय सुतार हा दुचाकीने मुंबई-गोवा महामार्गावरील सावर्डेमार्गे संगमेश्वर येथे जात होता. तर ट्रेलर चालक पृथ्वी बाबूनाथ हा गोव्याच्या दिशेने जात असताना त्याने त्याच्या ताब्यातील ट्रेलर सावर्डे बाजारपेठे येथे रस्त्यालगत उभा करून ठेवला होता. अजय सावर्डे बाजारपेठ येथे आला असता त्याने या उभ्या असलेल्या ट्रेलरला मागाहून जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, यात अजय गंभीर जखमी झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.
या घटनेची माहिती सावर्डे पोलिसांना मिळताच त्यानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक आबासाहेब पाटील, पोलीस उपनिरीक्षक प्रदीप गमरे आदींसह पोलीस कर्मचाऱ्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. अजय सुतार याचा मृतदेह विच्छेदनासाठी कामथे रुग्णालयात नेण्यात आला. या अपघातप्रकरणी धोकादायक स्थितीत ट्रेलर उभा केल्याप्रकरणी सावर्डे पोलीस ठाण्यात ट्रेलर चालक पृथ्वी बाबूनाथ याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे.
- अजयचा सुतारकामाचा व्यवसाय
अजय सुतार हा सुतारकामाचा व्यवसाय करत होता. यातूनच त्याची दसपटी परिसरात ओळख होती. असे असताना त्याचा अपघाती मृत्यू झाल्याने वालोटी गावावर शोककळा पसरली आहे. त्याच्या पश्चात आई, वडील, भाऊ असा परिवार आहे.








