विद्यापीठाकडून आदेश : 7 जुलैपर्यंत मुदत
बेळगाव : बेळगावच्या राणी चन्नम्मा विद्यापीठाशी (आरसीयू) संलग्न असलेली महाविद्यालये व स्वायत्त संस्थांना यापुढे आपल्या लेटरहेडवर विद्यापीठाचे नाव व लोगो घालावा लागणार आहे. असा आदेश विद्यापीठाचे कुलसचिव संतोष कामगौडा यांनी बजावला आहे. त्यामुळे सर्व महाविद्यालयांना विद्यापीठाचे नाव व लोगो आपल्या लेटरहेडवर समाविष्ट करावे लागणार आहे. बेळगाव व विजापूर जिल्ह्यांमध्ये राणी चन्नम्मा विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालये चालविली जातात. परंतु या महाविद्यालयांकडून विद्यापीठाचा कुठेही उल्लेख नसतो. त्यामुळे संबंधित कॉलेज कोणत्या विद्यापीठाशी संलग्न आहे, याची माहिती मिळण्यास अडचणी येत होत्या. त्यामुळे विद्यापीठाने हा नवा आदेश बजावून महाविद्यालयांना सूचना केली आहे.
7 जुलैपर्यंत मुदत
महाविद्यालय तसेच स्वायत्त संस्थांच्या प्राचार्यांना विद्यापीठाने पत्र पाठवून 7 जुलैपर्यंतची मुदत दिली आहे. 7 जुलैनंतर लेटरहेडवर विद्यापीठाचे नाव व लोगो न वापरल्यास कोणताही पत्रव्यवहार विद्यापीठाकडून स्वीकारला जाणार नाही, अशी सूचना करण्यात आली आहे.
पदवी प्रवेशासाठी मुदतवाढ
पदवी प्रवेशासाठी 30 जून अंतिम तारीख देण्यात आली होती. परंतु प्रवेश घेताना काही नव्याने संलग्न झालेल्या महाविद्यालयांना तांत्रिक अडथळे आले होते. त्यामुळे युयुसीएमएसवरून ऑनलाईन अर्ज सादर करताना विलंब होत आहे. त्यामुळे विद्यापीठाने दंड शुल्काशिवाय पहिल्या सत्राच्या प्रवेशाची मुदत 7 जुलैपर्यंत वाढविली आहे. त्यानंतर प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना 500 रुपये दंड शुल्कासह प्रवेश घ्यावा लागणार असल्याचे विद्यापीठाने स्पष्ट केले आहे.









