सौंदत्ती तालुक्यातील सुतगट्टीमध्ये तरुणाचा चाकूने खून
प्रतिनिधी/ बेळगाव
चाकूने भोसकून एका विद्यार्थ्याचा खून करण्यात आला आहे. शुक्रवारी सायंकाळी सौंदत्ती तालुक्यातील सुतगट्टी येथे ही घटना घडली असून गावातील मंदिराजवळ आट्यापाट्या खेळताना ही घटना घडली आहे. यासंबंधी पितापुत्रासह तिघा जणांवर एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
वेंकटेश ऊर्फ मुत्तू सुरेश दळवाई (वय 18) राहणार सुतगट्टी असे खून झालेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. त्याचा मित्र वेंकटेश सोमलिंग पेंटेद, त्याचे वडील सोमलिंग पेंटेद व राघु पेंटेद या तिघा जणांवर सौंदत्ती पोलीस स्थानकात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हल्ल्यात आणखी एक तरुण जखमी झाला आहे. उपलब्ध माहितीनुसार खून झालेला वेंकटेश व संशयित आरोपी असणारा वेंकटेश हे दोघे कॉलेजला जात होते. कॉलेजमध्ये या दोघा जणांमध्ये भांडण झाले होते. शुक्रवार दि. 30 मे रोजी सायंकाळी 6.30 वाजण्याच्या सुमारास सुतगट्टी येथील हुली आज्जा मंदिराजवळ गावातील मुले आट्यापाट्या खेळत होती. त्यावेळी आरोपीचा वडील सोमलिंगही तेथे होता.
खून झालेला वेंकटेश दळवाई व त्याचा मित्र भीमप्पा दळवाई यांच्याशी वाद उकरून काढण्यात आला. त्यावेळी वेंकटेशवर चाकूने हल्ला करण्यात आला. त्याला तातडीने इस्पितळात हलविण्यात आले. त्याआधीच त्याचा मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले. शनिवारी सिव्हिल हॉस्पिटलमधील शवागारात उत्तरीय तपासणी करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. सौंदत्ती पोलीस पुढील तपास करीत आहेत.









