कराड / प्रतिनिधी :
कराड शहरातील 24 तास पाणी योजनेच्या मीटर प्रमाणे पाणी बिलांच्या वसुलीवरील स्थगिती कायम ठेवताना जिल्हाधिकारी जितेंद्र दुडी यांनी जुन्या दराप्रमाणे वार्षिक पाणीपट्टी वसुली करण्यास नगरपालिकेस आदेश दिले आहेत. जुन्या बिलांच्या वसुलीवरील कोणतीही स्थगिती नसल्याचे पत्र आज जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी कराड पालिकेस दिले असून, तातडीने जुन्या दराने पाणी बिलांची वसुली करण्यास सूचना केल्या आहेत.
कराड नगरपालिकेत आर्थिक वर्ष एक एप्रिल 2022 पासून कराडमध्ये मीटर पद्धतीने पाणी बिले आकारणीचा निर्णय तत्कालीन मुख्याधिकारी व प्रशासक रमाकांत डाके यांनी घेतला होता. त्याप्रमाणे तीन महिन्याची बिले कराडकरांना देण्यात आली होती. मात्र भरमसाठ आकारणी केल्याची व मीटर पाणी येण्यापूर्वी हवेने फिरत असल्याची तक्रार कराडवासियांनी केली होती. याबाबत पालिकेतील विविध आघाड्या व राजकीय पक्षांकडूनही आंदोलने करण्यात आली होती. परिणामी याबाबतचा निर्णय जिल्हाधिकाऱ्यांच्या कोर्टात गेला. त्यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी नवीन मीटर पद्धतीने पाणी बिलांच्या आकारणीला स्थगिती दिली होती. त्याचप्रमाणे पाणीपट्टी वसुली स्थगिती दिली होती. दरम्यान मीटर पद्धतीने बिल आकारणीवर कोणताही निर्णय झालेला नव्हता. त्यामुळे पाणीपट्टीची आकारणी दिले वसूल केली जात नव्हती. त्यामुळे भविष्यात वीजबिले थकून कराड शहराचा पाणी पुरवठा खंडित होण्याची शक्यता होती. यामुळे पालिकेत नव्याने रुजू झालेले मुख्याधिकारी शंकर खंदारे यांनी नगरपालिकेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयाकडे 31 में रोजी पत्र पाठवले होते.
साताऱ्याचे नूतन जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी पाणीपट्टीचा प्रश्न तात्पुरता निकाली काढताना नव्या मीटर पद्धतीने बिलांच्या वसुलीला स्थगिती दिली असून जुन्या दराने पाणी बिले वसूल करण्यास कोणतीही स्थगिती नाही. त्यामुळे जुन्या दराने पाणी बिले वसूल करण्यात यावीत, असे पत्र नगरपालिकेला दिले. त्यामुळे नगरपालिकेचा पाणीपट्टी वसुलीचा मार्ग मोकळा झाला आहे. दरम्यान या निर्णयामुळे कराडकारांनी नवीन पाणी मीटर पद्धतीने पाणी बिलांचे आकारणी विरोधात दिलेल्या लढ्याला यश आल्याचे दिसत आहे. मीटर पद्धतीने पाणी बिलांच्या आकारणीवर अद्याप निर्णय झालेला नाही.