नेमणुकीनंतर प्रथमच कोल्हापुरातील टेन्युअर पूर्ण
संतोष पाटील कोल्हापूर
कोल्हापूरचे माळवते जिल्हाधिकारी राहुल रेखावार हे कार्यालयात रात्री दोन वाजेपर्यंत काम करणारे, सर्वसामान्यांसाठी दरवाजा उघडा ठेवणारे, अगदी मेसेजवरही चुटकीसरशी कामाचा निपटारा करणारे म्हणून परिचित होते. तर दुसऱ्या बाजूला मराठा आरक्षणातील वादंग माजवणारे वक्तव्य, महापालिकेच्या प्रभारी कारभारपणातील अडगळीतील फाईलींचा निपटारा, दोन वर्षात सर्वाधिक बंदूक परवाने, अँण्टिचेम्बर होणारी ठराविकांची उठ-बस, त्याच-त्या व्यावसायिक लोकांचा भोवती वावर, टोकाचा दुराग्रहीपणा यातून प्रशासनावर कमालीचा दबाव टाकण्याची वृत्ती आदी कारणांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या विरोधात अनेकवेळा नाराजी, तक्रारी अन् आंदोलने झाली. तीन- तीन पालकमंत्र्यांना त्यांच्या कृतीमुळे जाहीर दिलगिरी व्यक्त करावी लागली. या सर्वाचा परिपाक म्हणून कोल्हापुरातील आतापर्यंतचे सर्वाधिक चर्चेतील कलेक्टर म्हणून राहुल रेखावार स्मरणात राहतील.
राहुल रेखावार यांनी 15 जुलै 2021 रोजी कोल्हापूरचे जिल्हाधिकारीपदाचा कार्यभार स्विकारला. हिंगोली, परभणी, धुळे आणि बीड येथील त्यांची कारकिर्दीतही चर्चेत राहिली. या ठिकाणाहून त्यांच्या बदल्या होत गेल्या. यामागे स्थानिक नेतृत्व व काही वादाची पार्श्वभूमी होती. कोल्हापुरात कार्यभार स्विकारल्यानंतर पहिल्या महिन्यातच माध्यम प्रतिनिधींसोबत त्यांचा जोराचा वाद झाला होता. तत्कालीन पालकमंत्री सतेज पाटील यांनी मध्यस्थी करुन विषयावर पडदा पाडला.
दरम्यान, त्यांना भेटण्यास आलेला त्यांचा एका जवळच्या व्यक्तीला ताटकळत थांबावे लागल्याच्या कारणानंतर झालेला गैरसमज पुन्हा नको, यासाठी त्यांनी आपल्या केबीनचा दरवाजा कायमपणे उघडा ठेवण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले जाते. खरे- खोटे काहीही असले तरी यामुळे चंदगडपासून शिरोळपर्यंतचे नागरिक तलाठी ते प्रांतापर्यंतची तक्रार घेऊन येऊ लागले. प्रशासकीय उतरंडीत त्या-त्या टप्प्यावर कामाचा निपटारा करुन घेणे, ही प्रशासकीय हातोटी असते. तसे न होता लहान-सहान कामात स्वत: लक्ष घालावे लागणे, हे त्या अधिकाऱ्याचे प्रशासकीय अपयश समजले जाते. राहुल रेखावार बहुतांश वेळा रात्री दोन वाजेपर्यंत कार्यालयात थांबत असत. त्यांच्या दालनात रात्री बारा-बारा वाजता अधिकाऱ्यांच्या बैठका होत. दहा वाजताची बैठक रात्री एक-दोन वाजता कधीही सुरू होऊन संपत असे. वास्तविक हा तसा कौतुकाचा विषय होऊ शकतो. पण रात्रपाळीतील बैठका हा अधिकाऱ्यांमध्ये चर्चेचा व वैतागाचा विषय बनला होता.
दिवसभर अभ्यांगतांच्या भेटीवेळी एका वेळी दहा ते पंधरा अर्जदार त्यांच्या टेबलाभोवती जमा होत, तुमचे काय.. तुमचे काय… असे विचारत, यात अनेकवेळा महत्वाचे मुद्दे पुढे येणे राहूनच जात असल्याची खंत तक्रारदार सांगतात. यामध्ये प्रत्येकाला न्याय मिळावा, असे त्यांना वाटत असावे. पण त्यातून महत्त्वाची कामे बाजूला राहत होती, हे मात्र निश्चित. महापुराच्या काळात रेखावार यांनी पंचगंगेची पाणी पातळी 50 फुट गाठेल, असा अंदाज करुन निम्म्या शहरातील नागरिकांना घरे सोडण्यास भाग पाडले. प्रत्यक्षात पंचगंगा 40 फुटांवरच स्थिरावली. राहुल रेखावार यांनी ऐनवेळी बदललेल्या भूमिकेमुळे इचलकरंजी आणि कोल्हापुरात नदीत गणेश मूर्तीची पर्यावरणपुरक विसर्जनाची परंपरा खंडीत झाल्याची भावना पर्यावरणप्रेमींची आहे.
मराठा आरक्षण मागणीच्या बैठकीत रेखावार यांनी असे आरक्षण देणे म्हणजे इतर समाजाचा रोष ओढवून घेण्यासारखे असल्याचे खळबळजनक वक्तव्य केले. त्यातून समाजबांधवांनी विरोधात आंदोलन केले. तत्कालीन पालकमंत्री दीपक केसरकर यांनी माफी मागितली. तसेच रेखावार यांनीही जाहीरपणे लेखी माफीनामा दिला. अंबाबाई मंदिरात प्रसारमाध्यमांना मज्जाव प्रकरणी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी रेखावार यांना स्पष्ट शब्दात सुनावले. शिवाय पालकमंत्र्यांना माध्यम प्रतिनिधींची दिलगिरी व्यक्त करावी लागली. शेतकरी संघाची इमारत देवस्थान मंडळासाठी ताब्यात घेण्याचे प्रकरणही गाजले. न्यायालयाच्या आदेशानंतर संघाची जागा परत करावी लागल्याने प्रशासनाच्या या कारवाईमागे हेतू वेगळा असल्याची चर्चा रंगली.
शाहू मिल जागेत घेतलेल्या मोठं-मोठे, भव्य मनोरंजनाचा मुलामा अशा नाटकी कार्यक्रमातच राजर्षी शाहू स्मृती वर्ष सरल्याची खंत शाहूप्रेंमींना आजही आहे. प्रभारी प्रशासकपदाच्या वेळी शालिनी सिनेटोन प्रकरणी लेआऊट तत्काळ मंजुरीची केलेली घाई महापालिका वर्तुळात त्यांच्याभोवती संशयाचे धुके निर्माण करणारी ठरली. यापूर्वीच्या आयुक्त आणि प्रशासकांनी बाजूला ठेवलेल्या फाईली त्यांच्या प्रभारी काळात क्लिअर झाल्याचे पुराव्यानिशी बोलले जाते. त्यांच्या चेंबरमध्ये काही व्यावसायिक लोकांचा असणारा कायमपणे वावर यापूर्वी कोणत्याही जिल्हाधिक्रायाच्या कारकिर्दीत नसल्याचे बालले जाते.
राहुल रेखावार यांच्यावर कधीही भ्रष्टाचाराचा उघडपणे आरोप झाला नाही. परंतु एजंट म्हणून परिचित असलेली एक व्यक्ती अनेकवेळा अॅण्टिचेम्बरमध्ये तासन्तांस बसलेली असे, हा विरोधाभास पचनी न पडणारा होता. कोल्हापूरच्या इतिहासात पोलिसांनी नाकारुनही त्यांच्या कारकिर्दीत प्रथमच उच्चांकी बंदूक परवाना दिले गेले. राहुल रेखावार यांच्या कारकिर्दीला वादाची किनार असली तरी त्यांची दुसरी सकारात्मक बाजूही होती. सर्वसामान्यांच्या एका मेसेजवर ते कामाचा निपटारा करत असल्याचेही काहीजण सांगतात. पण कलेक्टरना थेट मेसेज करु शकतील अशा लोकांची संख्या किती असेल? महसूल विभागात प्रत्येक टेबलाचे मोल ठरलेले आहे. ते मोल देऊनच कागद पुढे सरकत असल्याचा अनुभव काल आणि आजपण कोल्हापूरकरांना होता. सहज उपलब्धता हा गुण असूनही महसुली थांबे रोखून सर्वसामान्यांना दिलासा देण्यात राहुल रेखावार यांना कितपत यश आले, हे त्यांचा कोल्हापुरातील कारकिर्दीचा आलेख सांगतो.
हे अधिकारी कायम राहतील स्मरणात
कोल्हापूरकरांना राजकीय आणि सामाजिक दबाव झुगारुन काम करणारा अधिकारी भावतो. आक्रमक भूमिकेनंतर दबाव घेऊन मवाळ होणाऱ्या अधिकाऱ्यांच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले जातात. मागील 20 वर्षात जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक आणि आयुक्त म्हणून काम केलेले अनेक अधिकारी कोल्हापूरकरांच्या कायमपणे स्मरणात राहतील, असे काम करुन गेले. मनुकुमार श्रीवास्तव, कुणालकुमार, लक्ष्मीकांत देशमुख, डॉ. मनोजकुमार शर्मा, दौलत देसाई, डॉ. अभिजीत चौधरी, डॉ. अभिनव देशमुख, मल्लिनाथ कलशेट्टी, डॉ. कादंबरी बलकवडे, शैलेश बलकवडे यांची कारकिर्द कोल्हापूरकर कधीही विसरणार नाहीत. माजी उपपंतप्रधान यशवंतराव चव्हाण नेहमी सांगायचे, राजकारण्यांनी ‘होय’ म्हणायला आणि प्रशासन अधिकाऱ्यांनी ‘नाही’ म्हणायला शिकले पाहिजे. तरच विकासाची चाके योग्य दिशेला जातील. अवैध आणि बेकायदेशीर कामासाठी राजकारण्यांसह दबाव टाकणाऱ्या प्रत्येक प्रवृत्तीला नाही, म्हणण्याची धमक असणारा अधिकारी लोकांना भावतो. ही धमक वरिल अधिकाऱ्यांमध्ये होती. ‘डेअर टू से नो’ अशी मानसिकता असणारे प्रशासनात खूप कमी अधिकारी आहेत. मात्र, बदली नको, खुर्ची वाचवण्याच्या नादात जी-सर जी-सर करणाऱ्या अधिकाऱ्यांचा मुखवटा फार काळ राहत नसल्याचा कोल्हापूरकरांचा अनुभव आहे.