मार्गसूचीचे पालन करण्याची सूचना
प्रतिनिधी /बेळगाव
शहरातील ज्योती कॉलेज येथे मतमोजणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी मंगळवारी ज्योती कॉलेज येथे भेट देऊन मतमोजणी केंद्र आणि स्ट्राँगरूमची पाहणी केली. स्ट्राँगरूम कशा प्रकारे राहिली पाहिजे, त्याठिकाणी बंदोबस्त कसा असावा, याबाबत निवडणूक आयोगाने मार्गसूची जारी केली आहे. त्यानुसार सर्व तयारी पूर्ण करा, अशी सूचना जिल्हाधिकाऱयांनी केली आहे.
मतमोजणी केंद्राबरोबरच निरीक्षकांची खोली, पोस्टल बॅलेट मतमोजणी खोली, माहिती प्रसार खोली स्थापण्याबाबत टेबल कशा प्रकारे असले पाहिजेत आणि माध्यम केंद्रांनादेखील खोली तयार करून त्याठिकाणी संपूर्ण माहिती देण्याबाबत योग्य नियोजन करावे, याबाबत सूचनादेखील त्यांनी केली.
मतमोजणी केंद्रामध्ये 14 टेबल लावण्याची व्यवस्था, त्याचबरोबर पायाभूत सुविधा उपलब्ध कराव्यात, स्ट्राँगरूमच्या सुरक्षेकडे अधिक लक्ष द्यावे, असेदेखील त्यांनी यावेळी सांगितले.
सीपीएड मैदानावर पार्किंगची व्यवस्था
मतमोजणीदिवशी केंदाच्या आवारात पार्किंगची व्यवस्था न करता ती जवळच असलेल्या सीपीएड मैदानावर करावी, असे जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी सांगितले. मैदान मोठे असल्यामुळे कोणत्याही प्रकारे त्याठिकाणी कोंडी होणार नाही. त्यासाठी नियोजन करावे, असेही स्पष्ट केले. सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंते संजीवकुमार हुलकाई यांनी निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वाची माहिती दिली. यावेळी अप्परजिल्हाधिकारी अशोक दुडगुंटी, पोलीस उपायुक्त रविंद्र गडादी, महापालिका आयुक्त डॉ. रुदेश घाळी, प्रांताधिकारी रविंद्र करलिंगण्णावर, तहसीलदार सारिका शेट्टी व इतर अधिकारी उपस्थित होते.









