माती परीक्षणाच्या अहवालानंतर मिळणार कामाला गती
बेळगाव
नियोजित जिल्हाधिकारी कार्यालयाच्या इमारतीचे डिझाईन बनविण्याचे काम धारवाड येथील गॅलवायीनी मॅनेजमेंट सर्व्हिस (जेएनएस) या कंपनीकडे देण्यात आले आहे. माती परीक्षणाचा अहवाल आल्यानंतर पुढील प्रक्रियेला सुरुवात करण्यात येणार असल्याचे सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे.
नूतन जिल्हाधिकारी कार्यालय उभारण्याच्या कामाला गती देण्यात आली आहे. यासाठी आवश्यक असणाऱ्या बाबींची पूर्तता करण्यावर बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांनी भर दिला आहे. जमिनीचे सर्वेक्षण करणे, माती परीक्षण आदी कामे सुरू झाली आहेत. नुकताच जिल्हाधिकारी कार्यालयासाठी संपादित करण्यात येणाऱ्या जागेत दोन ठिकाणी खोदाई करून माती संकलित करण्यात आली आहे. सदर माती परीक्षणासाठी सार्वजनिक बांधकाम खात्याच्या विश्वेश्वरय्यानगर येथील क्वॉलिटी कंट्रोल विभागाकडे पाठविण्यात आली आहे. माती परीक्षणाचा अहवाल आल्यानंतर सरकारकडे पाठविण्यात येणार आहे. त्यानंतर पुढील कार्यवाही सुरू केली जाणार असल्याचे बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे.
इमारतीच्या डिझाईनचे काम धारवाड येथील गॅलवायीनी मॅनेजमेंट सर्व्हिस यांच्याकडे सोपविण्यात आले आहे. माती परीक्षण अहवाल त्यांच्याकडेही पाठविला जाणार आहे. त्यानंतर इमारत उभारणीच्या कामाला गती मिळणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नावे दहा एकर जमीन असून त्यापैकी तीन एकर जमीन कार्यालयासह रस्ते व उद्यानासाठी संपादित केली जाणार आहे. नियोजित कामासाठी आवश्यक असणारी जमीन सर्वेक्षण करण्यात आली आहे. याचा अहवाल सरकारकडे देण्यात आला आहे. सध्या सुरू असणाऱ्या प्रक्रियेनुसार लवकरच कामाला सुरुवात होण्याची शक्यता आहे, असे बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे.









