रिझर्व्ह बँकेची महत्वपूर्ण घोषणा, अल्पभूधारक शेतकऱ्यांना मिळाला मोठा दिलासा
वृत्तसंस्था / मुंबई
देशातील छोट्या आणि मध्यम शेतकऱ्यांना मोठा दिलासा देताना रिझर्व्ह बँकेने विनातारण कर्जाची मर्यादा 1 लाख 66 हजार रुपयांवरून 2 लाख रुपयांपर्यंत वाढविण्याची घोषणा केली आहे. बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी ही घोषणा शुक्रवारी केली आहे. बँकेचे द्वैमासिक पतधोरण घोषित केल्यानंतर त्यांनी शेतकऱ्यांसाठीची ही शुभवार्ताही पत्रकार परिषदेत घोषित केली आहे.
कृषीसाठी लागणाऱ्या साधनांची किंमतवाढ झाल्याने या क्षेत्रातील गुंतवणूक महाग झाली आहे. तसेच एकंदर महागाई दरातही वृद्धी झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची अडचण होऊ नये, म्हणून तारणमुक्त कर्जाच्या मर्यादेत ही वाढ करण्यात आली आहे. या वाढीमुळे शेतकऱ्यांना सुलभरित्या आपल्या कृषी खर्चाची योजना करता येईल, असे प्रतिपादन शक्तिकांत दास यांनी केले.
कृषीसाठी निधीतही वाढ
कृषीकर्जासाठी उपलब्ध असणाऱ्या निधीतही वाढ करण्याचा निर्णय त्यांनी घोषित केला. तारणमुक्त कर्जासाठी यावेळी 1 लाख 60 हजार कोटी रुपयांच्या स्थानी 2 लाख कोटी रुपये उपलब्ध करुन देण्यात येतील. त्यामुळे अल्पभूधारक, छोट्या आणि मर्यादित भूमी असणाऱ्या शेतकऱ्यांना कर्जपुरवठा करण्यासाठी अधिक रक्कम उपलब्ध राहील. रिझर्व्ह बँकेकडून या सर्व निर्णयांच्या घोषणेचे स्वतंत्र सर्क्युलर प्रसिद्ध करण्यात येईल, अशी माहितीही त्यांनी दिली आहे.
तारणमुक्त कर्ज म्हणजे काय…
तारणमुक्त कर्ज याचा अर्थ असे कर्ज घेताना शेतकऱ्यांना त्यांची मालमत्ता किंवा भूमी बँकेकडे गहाण ठेवावी लागत नाही. तसेच त्यांना या कर्जासाठी अन्य कोणाची हमीही (सिक्युरिटी) द्यावी लागत नाही. या कर्जाची मर्यादा 2019 मध्ये वाढवून 1 लाख 66 हजार रुपये करण्यात आली होती. त्यानंतर पाच वर्षांनी आता ती पुन्हा वाढविण्यात आली असून ती 2 लाख रुपये करण्यात आली आहे.
किसान व्रेडिट कार्डाचे महत्व
छोट्या शेतकऱ्यांना कर्ज घेताना जटील प्रक्रियेतून जावे लागू नये, यासाठी किसान व्रेडिट कार्डाची सोय करण्यात आली होती. या कार्डामुळे स्वत:ची शेती स्वत: कसणारा मालक, दुसऱ्याची शेती कसणारा भाडेकरू, संयुक्तरित्या शेती कसणारे शेतकरी (शेअरक्रॉपर्स) अशा अनेक प्रकारच्या शेतकऱ्यांची सोय होत आहे. सहजगत्या तारणमुक्त कर्ज घेण्यासाठी हे कार्ड उपयोगी पडत आहे.
रुपे डेबिट कार्ड
अल्पभूधारक शेतकऱ्यांना तारणमुक्त कर्ज देणारी ही योजना रुपे डेबिट कार्डाच्या माध्यमातून क्रियान्वित केली जात आहे. तसेच या योजनेचा लाभ उठविण्यासाठी एकदाच कागदपत्रांची पूर्तता करावी लागते. तसेच कृषी साधने महाग झाल्यास अधिक कर्ज मिळण्याची सोयही यात अंतर्भूत आहे. कर्जाच्या मर्यादेपर्यंत कितीदाही पैसे काढण्याची सोय आहे. ही योजना कर्जाच्या अधिकतम मर्यादेपर्यंत एक ओव्हरड्राफ्ट असल्याप्रमाणे उपयोगात आणता येते.









