मंडणगड :
तालुक्यातील पालवणी गोसावीवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची संरक्षक भिंत २४ नोव्हेंबर २०२४ रोजी मुसळधार पावासामुळे कोसळली होती. ही भिंत अद्यापही दुरुस्त करण्यात आली नसल्याने धोका निर्माण झाला आहे.
या संदर्भात शाळा व ग्रामस्थांच्यावतीने गटविकास अधिकारी, गटशिक्षण अधिकारी, सरपंच यांना दुरुस्तीसाठी मागणीचे निवेदन ३० नोव्हेंबर रोजी देण्यात आले होते. मात्र त्यानंतर काहीच कार्यवाही न झाल्याने शाळेच्या पश्चिमेकडील रस्त्यालगतची ही भिंत अजूनही त्याच अवस्थेत आहे. यामुळे त्याच बाजूची आणखी १४ मीटरची भिंत कोसळण्याच्या स्थितीत आहे. या भिंतीचे दगड शाळेच्या इमारतीच्या भिंतीवर कोसळल्याने इमारतीसही धोका निर्माण झाल्याचे निवेदनात नमूद केले आहे.
मात्र संबंधित विभागाने ही बाब गांभीर्याने न घेतल्याने ग्रामस्थांमधून नाराजी व्यक्त होत आहे. सध्या पावसाने जोर धरल्याने या पार्श्वभूमीवर शाळेची संरक्षक भिंत तातडीने बांधून देण्याची मागणी ग्रामस्थांतून करण्यात येत आहे.
- गांभीर्य नाही…
२०२४मध्ये कोसळलेली भिंत अद्यापही केली नाही दुरुस्त
शाळा, ग्रामस्थांनी मागणी निवेदन करुनही व्यर्थ








