वेलिंग्टन-न्यूझीलंड / वृत्तसंस्था
न्यूझीलंडचा अष्टपैलू क्रिकेटपटू कॉलिन डी ग्रँडहोमने बुधवारी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. या आठवडय़ाच्या प्रारंभी क्रिकेट न्यूझीलंडने मुख्य करारातून मुक्त करण्याची तयारी दर्शवल्यानंतर त्याने हा निर्णय घेतला. झिम्बाब्वेतील जन्म असलेल्या या दिग्गज खेळाडूने निवृत्ती घेण्यामागे बरीच कारणे असल्याचे म्हटले आहे.
‘मी आता पूर्वीसारखा तरुण राहिलेलो नाही. दुखापतीशी बरेच झुंजावे लागले आहे आणि ट्रेनिंग कठीण होत चालले असल्याने शरीराची साथ लाभत नाही. कुटुंबाला वेळ देणेही तितकेच महत्त्वाचे आहे. ते जमत नव्हते. क्रिकेटमध्ये निवृत्तीनंतर माझे भविष्य कसे असेल, याचा मला अंदाज नाही. पण, मागील काही आठवडय़ापासून मी याचबाबत विचारमंथन करत आहे’, असे 36 वर्षीय ग्रँडहोमने यावेळी नमूद केले.
‘2012 मध्ये पदार्पण केल्यानंतर सातत्याने किवीज संघात प्रतिनिधित्वाची संधी मिळाली, याबद्दल मी स्वतःला सुदैवी मानतो. मला माझ्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीचा अभिमान आहे. मात्र, आता थांबण्याची वेळ आली आहे’, असे ग्रँडहोम पुढे म्हणाला. या दिग्गज अष्टपैलू खेळाडूने 29 कसोटी सामन्यात 38.70 च्या सरासरीने 1432 धावा केल्या असून यात विंडीज व दक्षिण आफ्रिकेविरुद्ध शानदार शतकांचा समावेश राहिला. याशिवाय, पाकिस्तानविरुद्ध पदार्पणाच्या लढतीत त्याने 41 धावात 6 बळीही नोंदवले. न्यूझीलंडने उद्घाटनाची आयसीसी विश्व कसोटी चॅम्पियनशिप जिंकली, त्यात ग्रँडहोमचा मोलाचा वाटा राहिला होता.
कॉलिन ग्रँडहोमने याशिवाय, वनडे क्रिकेटमध्ये 45 सामन्यात 106.15 च्या स्ट्राईक रेटने 742 धावा केल्या आणि गोलंदाजीत 41.00 च्या सरासरीने 30 बळी घेतले. न्यूझीलंडने 2019 आयसीसी क्रिकेट वर्ल्डकप फायनलमध्ये धडक मारली, त्यातही या दिग्गज खेळाडूने लक्षवेधी योगदान दिले. त्याने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 47 चेंडूत 60, पाकिस्तानविरुद्ध 64 धावा जमवल्या. तसेच, इंग्लंडविरुद्ध 10 षटकांचा कोटा पूर्ण करत 25 धावात 1 बळी, असा किफायतशीर मारा केला. त्याने याशिवाय 41 टी-20 सामन्यात 138.55 च्या स्ट्राईक रेटने 505 धावा केल्या. तसेच, 38.41 च्या सरासरीने 12 बळी घेतले.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कॉलिन डी ग्रँडहोम
क्रिकेट प्रकार / सामने / धावा / सर्वोच्च / बळी / सर्वोत्तम
कसोटी / 29 / 1432 / 120 ना. / 49 / 6-41
वनडे / 45 / 742 / 74 ना. / 30 / 3-26
टी-20 / 41 / 505 / 59 / 12 / 2-22.









