मध्यप्रदेशात मुलांच्या मृत्यूनंतर कठोर पाऊल
वृत्तसंस्था/ चंदीगड
पंजाब सरकारने कोल्ड्रिफ कफ सिरपवर तत्काळ प्रभावाने बंदी घातली आहे. मध्यप्रदेश सरकारच्या ड्रग टेस्टिंग लॅबोरेट्रीला या सिरपमध्ये डाय इथिलीन ग्लायकॉल (डीईजी) आढळून आले असून हे विषारी रसायन असल्याचे पंजाबच्या अन्न आणि औषध प्रशासन विभागाने आदेश जारी करत सांगितले आहे. मध्यप्रदेशच्या छिंदवाडामध्ये काही मुलांच्या मृत्यूचे कारण याच सिरपला मानले जात आहे.
या सिरपला ‘नॉट ऑफ स्टँडर्ड क्वालिटी’ घोषित करण्यात आले आहे आणि पंजाबमध्ये याची विक्री, वापर आणि वितरणावर पूर्णपणे बंदी घालण्यात आल्याचे सरकारच्या आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.
याचदरम्यान अनेक राज्यांमध्ये विषारी कफ सिरपमुळे मुलांच्या मृत्यूचे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात पोहोचले आहे. वकील विशाल तिवारी यांनी सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करत याप्रकरणाची चौकशी राष्ट्रीय न्यायिक आयोग किंवा सीबीआयद्वारे तज्ञांची समिती स्थापन करत करविण्याची मागणी केली आहे.
चौकशीची देखरेख सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशाकडून करण्यात यावी असे याचिकेत म्हटले गेले आहे. डाय इथिलीन ग्लायकॉल आणि एथिलीन ग्लायकॉलची विक्री आणि देखरेखीचे नियम कठोर करणे, विविध राज्यांमध्ये नोंद एफआयआर एकाचठिकाणी वर्ग करणे, विषारी सिरप निर्माण करणाऱ्या कंपन्यांचे परवाने रद्द करण्याची मागणी याचिकेत करण्यात आली आहे. हे प्रकरण केवळ काही कंपन्यांच्या चुकांचे नसून देशाच्या औषध नियामकीय व्यवस्थेच्या अपयशाचे आहे, यामुळे अनेक राज्यांमध्ये निष्पापांना जीव गमवावा लागला असल्याचे याचिकेत नमूद करण्यात आले आहे.









