बेळगाव : मागील 15 दिवसांपासून गायब झालेल्या थंडीच्या प्रमाणात पुन्हा वाढ झाली आहे. यंदा सातत्याने हवामानात बदल होऊ लागला आहे. कधी थंडी, कधी ऊन तर कधी ढगाळ वातावरण अशा संमिश्र वातावरणाला सामोरे जावे लागत आहे. मागील दोन दिवसांपासून थंडीचा कडाका पुन्हा वाढू लागला आहे. त्यामुळे पहाटे आणि रात्री थंडीची हुडहुडी जाणवू लागली आहे. डिसेंबर प्रारंभी थंडीला प्रारंभ झाला होता. त्यानंतर ढगाळ वातावरण आणि अधूनमधून झालेल्या किरकोळ पावसामुळे थंडीच्या प्रमाणात घट झाली होती. आता पुन्हा जानेवारी प्रारंभापासून थंडी जाणवू लागली आहे.
यंदा म्हणावी तशी थंडी नसली तरी अधूनमधून थंडीची झलक अनुभवयास मिळत आहे. मात्र जानेवारी आला तरी अद्याप अधूनमधून ढगाळ वातावरण कायम आहे. दुपारी उन्हाच्या झळा सोसाव्या लागत असल्या तरी पहाटे आणि रात्री थंडीची तीव्रता जाणवत आहे. यंदा परतीच्या पावसानंतर सातत्याने हवामानात बदल होऊ लागला आहे. ऊन, वारा, पाऊस, ढगाळ वातावरण अशा संमिश्र वातावरणाला सामोरे जावे लागत आहे. या बदलत्या हवामानाचा मानवी जीवनावरही परिणाम होऊ लागला आहे. दोन-चार दिवसात थंडीची तीव्रता वाढल्याने पुन्हा उबदार कपड्यांना पसंती दिली जात आहे.









