77 हजार पशूंचाही मृत्यू ः उणे 28 अंशावर पोहोचले तापमान
वृत्तसंस्था/ काबूल
अफगाणिस्तानात 15 दिवसांमध्ये कडाक्याच्या थंडीमुळे 157 जणांना जीव गमवावा लागला आहे. तेथील तापमान उणे 28 अंश सेल्सिअसपर्यंत खालावले आहे. देशातील 2 कोटी 83 लाख लोकांना म्हणजेच दोन तृतीयांश लोकसंख्येला जिवंत राहण्यासाठी त्वरित मदतीची गरज असल्याचे संयुक्त राष्ट्रसंघाने म्हटले आहे.
थंडीमुळे अफगाणिस्तानच्या ग्रामीण भागात सर्वाधिक लोकांचा मृत्यू झाल्याचा दावा तालिबानचे मंत्री मोहम्मद अब्बास अखुंद यांनी केला आहे. तालिबानची राजवट आल्यापासून अफगाणिस्तानात आर्थिक आणि मानवाधिकार संकट वाढतच चालले आहे. तालिबानने अलिकडेच स्वयंसेवी संस्थांमध्ये महिलांच्या काम करण्यावर बंदी घातली आहे, यामुळे देखील प्रतिकूल हवामानाला तोंड देत असलेल्या लोकांपर्यंत मदत पोहोचविणे अवघड ठरत चालले आहे.

तालिबानने डिसेंबरमध्ये एनजीओत काम करणाऱया महिलांवर बंदी घातली होती. यानंतर तेथे मदतसामग्री पोहोचविणाऱया विदेशी सहाय्य संस्थांनी स्वतःची मोहीम रोखली होती. या संस्थांच्या मोहिमांमध्ये महिला कर्मचाऱयांचे प्रमाण अधिक होते. अफगाणिस्तानचा खर्च भागविण्यासाठी अमेरिकेसह अन्य देशांकडून 75 टक्क्यांहून अधिक निधी मिळत होता. परंतु 2021 मध्ये अमेरिकेने अफगाणिस्तानातून स्वतःचे सैन्य काढून घेतले होते. यानंतर तेथील आर्थिक घडी विस्कटून गेली आहे.
तालिबानची राजवट आल्यावर अफगाणिस्तानच्या मध्यवर्ती बँकेची सुमारे 10 अब्ज डॉलर्सची संपत्ती विदेशात गोठविण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने देखील 44 कोटी डॉलर्सचा निधी रोखला आहे. अफगाणिस्तान सध्या चलनदरातील घसरण, अन्नधान्य तसेच पेट्रोल-डिझेलच्या दरातील मोठी वाढ, खासगी बँकांमधील रोकड टंचाई याप्रकारच्या संकटांना सामोरा जात आहे.









