क्यूबाला पुरविली होती अमेरिकेची गुप्त माहिती
वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन
अमेरिकेने शीतयुद्ध काळातील गुप्तहेर एना मोंटेसची 20 वर्षांनी कैदेतून मुक्तता केली आहे. एना मोंटेस ही एक डबल एजंट होती. अमेरिकेने तिला इंटेलिजेन्स ऍनालिस्ट म्हणुन क्यूबाची माहिती प्राप्त करण्यासाठी नेमले होते, परंतु एनाने अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणेत स्वतःच्या देशाच्या विरोधातच काम करणे सुरू केले होते. 2001 मध्ये तिला पकडण्यात आल्यावर अमेरिकेच्या अधिकाऱयाला एनाला ‘मोस्ट डेडली वुमन’ असे संबोधिले होते. एना स्वतःचा सिक्रेट कोड पर्समध्ये ठेवायची असे सांगण्यात येते.
एना मोंटेसने न्यायालयात अमेरिकन अधिकाऱयांची माहिती क्यूबाला पुरविल्याची कबुली दिली होती. अमेरिकन हेरयंत्रणेशी निगडित गोपनीय माहिती क्यूबाच्या अधिकाऱयांपर्यंत पोहोचवित असल्याचेही तिने मान्य केले होते. एनाच्या या कृत्यामुळे अमेरिकेच्या क्यूबामधील अनेक मोहिमांना अपयश आले होते.
एना मोंटेसला पकडण्यास महत्त्वाची भूमिका बजावणारे डीआयए अधिकारी क्रिस सायमन्स यांनी तिला डेडली वुमन ठरविले होते. इतिहासात अनेक डबल एजंट राहिले, परंतु एनाने वारंवार अमेरिकन नागरिकांना ठार करविण्याचा प्रयत्न केला होता असे सायमन्स यांनी म्हटले होते.
एना 16 वर्षांपर्यंत क्यूबासाठी हेरगिरी करत होती. तरीही तिच्यावर कुणालाच संशय आला नव्हता. एना कधीच कुठलाही शासकीय दस्तऐवज स्वतःच्या घरी घेऊन जात नव्हती. याऐवजी ती संवेदनशील माहिती तोंडपाठ करत घरी जाऊन स्वतःच्या लॅपटॉपमध्ये टाइप करत होती. ही माहिती क्यूबापर्यंत पोहोचविण्यासाठी एना एका कोडमध्ये ती रुपांतरित करत डिस्कमध्ये स्टोअर करत होती. मग रेडिओच्या शॉर्ट वेव्हद्वारे ही डिस्क कुठे पोहोचवायची हे तिला क्यूबाच्या अधिकाऱयांकडून सांगितले जात होते.
अमेरिकेच्या यंत्रणेने एनाला अनेकदा पदोन्नती दिली होती. तसेच तिला गौरविण्यात देखील आले होते. अमेरिकेत तिच्यासोबत काम करणारे सहकारी तिला ‘क्वीन ऑफ क्यूबा’ म्हणायचे. 1996 मध्ये मोंटेसला एका आंतरराष्ट्रीय प्रकरणावरून पेंटागॉनमध्ये बोलाविण्यात आले होते, परंतु तिने प्रोटोकॉल तोडला आणि ती पोहोचली नाही. डीआयएचे काउंटर इंटेलिजेन्स अधिकारी स्कॉट करमाइकल यांना तिच्या वर्तनाबद्दल संशय वाटला. तिच्या चौकशीदरम्यान एना काहीतरी लपवत असल्याचा संशय बळावला. यानंतर अधिक चौकशी करण्यात आल्यावर एनाच्या विरोधात पुरावे सापडत गेले. एनाला 2001 मध्ये अटक करण्यात आली होती.









