शासनाकडून 70 लाख रुपयाचे अनुदान मंजूर : फळ-फुलांची होणार साठवणूक : बागायत शेतकऱ्यांना उपयुक्त
बेळगाव : फळ, फुले आणि भाजीपाला सुरक्षित रहावा, यासाठी जिल्ह्यात नवीन सुसज्ज असे शीतगृह बांधण्यात येणार आहे. शासनाने यासाठी 70 लाख रुपयांची तरतूद केली आहे. राज्यात यापूर्वी 53 शीतगृहे उभारण्यात आली आहेत. यासाठी तब्बल 180 कोटींचा निधी खर्ची घालण्यात आला आहे. आता पुन्हा राज्यातील सात जिल्ह्यामध्ये नवीन 8 शीतगृहे बांधण्यात येणार आहेत. यामध्ये बेळगाव जिल्ह्याचा समावेश आहे.
जिल्ह्यात बागायत क्षेत्र वाढू लागले आहे. त्यामुळे फळे, फुले आणि भाजीपाला उत्पादनात भरमसाट वाढ झाली आहे. मात्र उत्पादित केलेला माल शीतगृहा अभावी खराब होऊ लागला आहे. यासाठी जिल्ह्यात लवकरच नवीन सुसज्ज असे शीतगृहे उभारले जाणार आहे. सहा महिन्याहून अधिककाळ उत्पादित माल सुरक्षित ठेवण्यासाठी कोल्ड स्टोरेजची गरज असते. दरम्यान उत्पादक शेतकऱ्यांकडून जिल्ह्यात शीतगृह व्हावे, अशी मागणी होत होती. त्यानुसार सरकारने जिल्ह्याला एक शीतगृह उभारण्यासाठी मंजुरी दिली आहे. जिल्ह्यात दोन लाखाहून अधिक बागायती शेतकरी आहेत. या शेतकऱ्यांचा उत्पादित माल अधिककाळ सुरक्षित ठेवण्यासाठी या शीतगृहाची मदत होणार आहे. अधिक क्षमता असणारे शीतगृह उभारले जाणार आहे. त्यामध्ये बटाटा, टोमॅटो, कांदे, आले, चिंच, मिरची, द्राक्षे आदी फळांची साठवणूक करता येणार आहे. त्याबरोबर विविध भाज्यादेखील यामध्ये ठेवता येणार आहेत. शीतगृहाअभावी शेतकऱ्यांना उत्पादित माल रस्त्यावर फेकून द्यावा लागतो. अधिक उत्पादन झाल्यानंतर बाजारपेठेत योग्य भाव मिळत नाही. दरम्यान असा माल कुजून जातो. त्यामुळे शेतकऱ्यांना फटका बसतो. शीतगृहाची उभारणी झाल्यानंतर उत्पादित मालाची योग्य साठवणूक करून ज्यावेळी भाव वाढेल त्यावेळी तो बाहेर काढता येतो.
लवकरच बांधकामाला प्रारंभ होणार
बेळगाव जिल्ह्याला एक शीतगृह मंजूर झाले आहे. लवकरच बांधकामाची कार्यवाही सुरू होणार आहे. त्यामुळे खराब होणारा उत्पादित माल सुरक्षित राहणार आहे. शिवाय बागायत शेतकऱ्यांना याचा लाभ होणार आहे.
– महांतेश मुरगोड (बागायत खाते, सहसंचालक)









