काही ठिकाणी उगवण तर काही ठिकाणी पेरणी
बेळगाव : मागील काही दिवसांपासून थंडीची तीव्रता वाढू लागल्याने कडधान्य पिकाला पोषक वातावरण निर्माण झाले आहे. मध्यंतरी झालेल्या पावसाने आणि ढगाळ वातावरणामुळे कडधान्य पिके धोक्यात आली होती. मात्र आता पेरणी झालेल्या कडधान्य पिकाला थंडीने दिलासा मिळाला आहे. रब्बी हंगामात मसूर, हरभरा, वाटाणा, मोहरी आदी कडधान्यांची पेरणी होऊ लागली आहे. काही ठिकाणी कडधान्य उगवून आले आहेत. अशा पिकांना थंडीचे वातावरण पोषक ठरू लागले आहे. मध्यंतरी झालेल्या किरकोळ पावसाने आणि ढगाळ वातावरणामुळे पेरणी कामात अडथळा निर्माण झाला होता. काही ठिकाणी अद्याप सुगी हंगाम लांबणीवर पडला आहे. मात्र आता शेवटच्या टप्प्यातील सुगी हंगामाकडे शेतकरी वळला आहे. काही ठिकाणी कडधान्य पेरणीलाही जोर आला आहे. तर काही ठिकाणी पेरणी झालेली कडधान्ये जोमाने आली आहेत. येळ्ळूर, धामणे, झाडशहापूर, मजगाव, वडगाव, बसवण कुडची, निलजी, सांबरा आदी भागात मसूर, वाटाणा, हरभरा आदी पिकांची पेरणी झाली आहे. उगवण झालेल्या कडधान्य पिकाला थंडीचे वातावरण पोषक ठरू लागले आहे.









