प्रतिनिधी/ बेळगाव
बेळगाव शहर व उपनगरांमध्ये शनिवारी भक्तीपूर्ण वातावरणात ताबूत विसर्जन करण्यात आले. जामा मशीद परिसरात पंजांच्या भेटी घेण्यात आल्या. शहराच्या विविध भागात सकाळपासून पंजा मिरवणूक काढली जात होती. मुस्लीम बांधव मोठ्या संख्येने या मिरवणुकीमध्ये सहभागी झाले होते.
प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षीही पारंपरिक पद्धतीने हिंदू-मुस्लीम सौहार्दपूर्ण वातावरणात मोहरम साजरा झाला. मोहरमपूर्वी नऊ दिवस विविध ठिकाणी पंजे बसविले जातात. दहाव्या दिवशी या पंजांची भेट होते. त्यानंतर त्यांचे विसर्जन होते. शनिवारी मोहरमचा मुख्य दिवस असल्याने मुस्लीमबहुल भागात गर्दी झाली होती.
दरबार गल्ली येथील शेरखान जामा मशीदच्या परिसरात पंजांच्या भेटीचा कार्यक्रम पार पडला. यावेळी जालगार गल्ली, टोपी गल्ली, रुक्मिणीनगर, कसाई गल्ली, कॅम्प, नागझरी, गांधीनगर, रामतीर्थनगर, अनगोळ व परिसरामधील पंजे भेटीसाठी दाखल झाले होते. सायंकाळनंतर ताबुतांची मिरवणूक काढण्यात आली. या पार्श्वभूमीवर शहरात कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.









