वृत्तसंस्था/ जोहान्सबर्ग
दक्षिण आफ्रिकेने विश्वचषक वनडे क्रिकेट स्पर्धेसाठी 15 सदस्यीय संघाची घोषणा मंगळवारी केली असून या संघाचे नेतृत्वा टेम्बा बवुमाकडे सोपविण्यात आले आहे.
वेगवान गोलंदाज गेराल्ड कोएत्झीच्या समावेशामुळे सर्वांचे लक्ष वेधले गेले आहे. यावर्षीच त्याने संघात आंतरराष्ट्रीय पदार्पण केले होते. त्याने खेळलेल्या दोन सामन्यात 5 बळी मिळविले असून पदार्पणाच्या सामन्यात त्याने 3 बळी टिपले होते. या संघात डी कॉक, रीझा हेन्ड्रिक्स, हेन्रिच क्लासेन, एडन मार्करम, डेव्हिड मिलर, रासी व्हान डर ड्युसेन यासारख्या अनुभवी खेळाडूंचा समावेश आहे. कागिसो रबाडा वेगवान गोलंदाजांचे नेतृत्व करेल. याशिवाय अॅन्रिच नॉर्त्जे, लुंगी एन्गिडी यांचीही त्याला साथ मिळेल. भारतीय वातावरणात केशव महाराज, तबरेज शम्सी हे त्यांचे स्पिनर्स प्रभावी कामगिरी करतील, अशी अपेक्षा आहे. वर्ल्ड कपमधील त्यांचा पहिला सामना लंकेविरुद्ध 7 ऑक्टोबर रोजी नवी दिल्लीत होईल. त्याआधी अफगाण व न्यूझीलंडविरुद्ध त्यांचे सराव सामने 29 सप्टेंबर व 2 ऑक्टोबर रोजी होतील.
दक्षिण आफ्रिका संघ : टेम्बा बवुमा (कर्णधार), गेराल्ड कोएत्झी, डी कॉक, हेन्ड्रिक्स, मार्को जान्सेन, क्लासेन, सिसांदा मगाला, केशव महाराज, मार्करम, डेव्हिड मिलर, एन्गिडी, नॉर्त्जे, रबाडा, शम्सी, रासी व्हान डर ड्युसेन.









